गावागावात प्लॉस्टीक बंदीची लोकचळवळ उभी करावी- आमदार राजू कारेमोरे यांचे आवाहन

0
13

· स्मशानभूमित केले प्लॉस्टीक संकलन व स्वच्छता श्रमदान

· कापडी पिशव्यांचे वितरण*

भंडारा, दि. 3 : दैनंदिन व्यवहारातील घरगुती वापरात प्लॉस्टीक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे गावांमध्ये ठिकठिकाणी प्लॉस्टीक कचरा आढळून येतो. प्लॉस्टीक कचऱ्याचे समुळ निर्मूलन करायचे असेल तर घरांघरांत प्लॉस्टीक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करून गावांगावांत प्लॉस्टीक बंदीची लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन आमदार राजू कारेमोरे यांनी केले. स्वच्छता ही सेवा मोहिमेतंर्गत काल रविवारी (2 ऑक्टोबर) ला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा, पंचायत समिती मोहाडी व ग्राम पंचायत वरठी (पं.स. मोहाडी) यांचे संयुक्त विद्यमाने वरठी येथील स्मशानभूमीत आयोजित प्लॉस्टीक कचरा संकलन व स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विनय मून यांचे मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमाला मोहाडी पं.स.चे सभापती मा. श्री रितेश वासनिक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत, गट विकास अधिकारी पल्लवी वाडेकर, जि. प सदस्य मा. श्री एकनाथ फेडर, प.स. सदस्य श्री देवाजी चकोले, सरपंच श्वेता येळणे, सचिव दिगांबर गभने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ, सल्लागार, ग्राम पंचायत पदाधिकारी, गट संसाधन केंद्राचे कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

आमदार राजू कारेमोरे म्हणाले, बदलत्या लाईफस्टाईलमुळे वैयक्तिक व कुटूंबस्तरावर एकल प्लॉस्टीकचा वापर होत आहे. सरकारने त्यावर बंदी घातलेली असतानाही वापर सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण, वसुंधरेला धोका निर्माण झाला आहे. गाव प्लॉस्टीक मुक्त करायचा असेल तर एकल प्लॉस्टीक वापर बंदीची गावस्तरावर प्रभावी अंमलबजावणी व्हावी. त्याऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करावा. प्लॉस्टीक बंदीची लोकचळवळ गावात उभी करून गाव, परिसर स्वच्छतेवर भर द्यावा, त्याकरीता प्रत्येकांनी आपला सहभाग द्यावा. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधा गावात निर्माण करून गावाला स्वच्छ व सुंदर करण्याचे आवाहन आमदार मा. श्री राजू कारेमोरे यांनी याप्रसंगी केले.

स्वच्छता ही सेवा मोहिमेतंर्गत ग्राम पंचायत वरठी येथील स्मशानभूमित साचून असलेल्या प्लॉस्टीक कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरीता आमदार राजू कोरेमोरे यांचे प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी प्लॉस्टीक कचऱ्याचे संकलन केले. त्यानंतर श्रमदानाने स्मशानभूमिची स्वच्छता करण्यात आली. स्मशानभूमितील संकलीत करण्यात आलेला प्लॉस्टीक कचरा वाहनांमध्ये भरून साठवणूकीच्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर श्रमदानाने स्मशानभूमि परिसरात स्वच्छता करण्यात आली. प्लॉस्टीक कचऱ्याचे संकलन करून स्वच्छता करण्यात आल्याने स्मशानभूमि परिसर स्वच्छ झाले. गावागावात प्लॉस्टीक ऐवजी कापडी पिशव्याचा वापर व्हावा या करीता कार्यक्रमाला उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्लॉस्टीक बंदीचा व कापडी पिशव्यांचा वापर व्हावा, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व मान्यवरांचे आभार सचिव दिगांबर गभने यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कक्ष, तालुका व ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.