शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नोंदणी करा- अपर जिल्हाधिकारी राजेश खवले

0
21

गोंदिया, दि. 07 :  नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी एक आक्टोंबर पासून मतदार  नोंदणी प्रक्रीया सुरू झाली असून पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला फार्म 19 भरून मतदार व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे व नायब तहसीलदार आप्पासाहेब वलखेडे उपस्थित होते. 01 ऑक्टोबर 2022 पासून मतदार नोंदणी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

           25 ऑक्टोबरला दुसरी व अंतीम सूचना प्रसारित झाल्यानंतर 07 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. प्रारूप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक 25 डिसेंबर 2022 आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक ऑक्टोबर 2022 पासून तर 9 डिसेंबर 2022 पर्यंत दोन टप्प्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमुना 19 भरणे अनिवार्य आहे.

कोण करू शकतो मतदान

              गोंदिया जिल्ह्यातील माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमध्ये 01 नोव्हेंबर 2016 ते 01 नोव्हेंबर 2022 या सहा वर्षाच्या कालावधीत सलग किंवा टप्प्याटप्प्याने किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेले शिक्षकच यासाठी पात्र मतदार असणार आहेत. शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाचा फॉर्म 19 भरणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदार यादी तयार होते, यासाठी दरवेळी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मतदारालाच मतदान करण्याचा हक्क आहे.

           या नोंदणीसाठी प्रत्येक तालुक्याला सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसिलदार व उपविभागीय अधिकारी पदनिर्देशीत अधिकारी म्हणून काम करतील.

मतदार ओळखपत्र-आधार जोडणी

          जिल्ह्यात एकूण चार विधानसभा क्षेत्र असून एकूण मतदारांची संख्या 10 लाख 95 हजार 186 आहे.  यापैकी               05 लाख 85 हजार889 मतदारांची मतदार ओळखपत्र आधारशी जोडणी झाली आहेत. जिल्ह्यात आधार जोडणी     53.50 टक्के झाली असून आधार जोडणीचे काम वेगाने सुरू आहे.