लोकगीतांतून लोकशाहीचा जागर स्पर्धेत सहभागी व्हा- जिल्हाधिकारी

0
41

 गोंदिया,दि 07:  लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे “लोकगीतांतून लोकशाहीचा जागर” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा कालावधी 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2022 आहे. या स्पर्धेत नागरिक तसेच कलावंतांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

          निसर्गाशी संवाद साधणारी, श्रमपरिहारासाठी गायली जाणारी लोकगीते जशी आहेत; तशी पोवाड्यासारखे शौर्यगीत, लावणीसारखे शृंगारगीत यांसारखी लोकगीतेही आहेत. तसेच भारुडासारखे आध्यात्मिक प्रबोधनपर गीतही आहे. भोंडलाहादगा, मंगळागौर, फुगडी, झिम्मा यांसारखी गाणी त्यांच्या लय-तालबध्दतेमुळे आताही स्त्रिया गातात. या गीतांमधून लोकशाही, मताधिकारी बद्दल जागृती करणे सहज शक्य आहे.

            मतदार यादीत नाव नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर अमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर गीतरचना करुन लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल.

              पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डे मुक्त रस्ते, चांगले शिक्षण, चांगली घरे, अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास प्राप्त होणे, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या अमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरुपी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारख्या विचारांची गुंफण लोकगीतांतून करता येईल.

                 स्त्रियांच्या गीतात सासर-माहेरचे उल्लेख असतात. लोकगीतांमधले माहेर गोड असते, जिथे खायाला सापडते; तर सासर व्दाड असते, जे कोंडून मारते. सासर-माहेरच्या जागी लोकशाही – हुकुमशाही यांची प्रतीकात्कक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. लोकगीतांच्या अंगतभूत लवचीक स्वरुपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणेही शहज शक्य आहे आणि हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसे व्हावे, हे सांगता येईल. लोकगीतांतील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तीमत्वाची आहे. निर्णयक्षम आहे, हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे लोकगीतातून आवाहन करता येईल.

                  समूह आणि एकल गटामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. समूह गटासाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये, व्दितीय क्रमांक अकरा हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. तर एकल गटासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये, व्दितीय क्रमांक पाच हजार रुपये, तृतीय क्रमांक तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (8669058325) तुषार पवार (9987975553) यांच्याशी संपर्क साधावा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर स्पर्धेची नियमावली देण्यात आलेली आहे.