
देवरी येथे पूर्व पोलिस भरती प्रशिक्षण शिबिराची सांगता
देवरी,दि.11- अगदी पुरातन काळाचा विचार केला तर एकलव्य असो की दानवीर कर्ण, यापैकी एकाला ही मार्गदर्शक वा गुरू मिळाला नाही. ही बाब दोघांसाठी बलस्थान ठरली. आपल्यातील जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी आपल्या क्षेत्रात उतुंग यश मिळविले. त्यांच्या तेजापुढे भलेभले योद्धे नतमस्तक झाले. म्हणून यापुढे परिस्थितीला दोष न देता अपार कष्ट करा आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायची जिद्द बाळगा, कारण श्रमाला दुसरा पर्याय असूच शकत नाही, असे प्रतिपादन देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी देवरी येथे आज (दि.11) रोजी केले.
ते स्थानिक एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाच्या सभागृहात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि गोंदिया पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूर्व पोलिस भरती प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, देवरीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद गजभिये आणि देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री बनकर म्हणाले की, दान म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर आपल्या जवळ समाजाचे भले होईल असे देण्यासारखे जे काही आहे, ते समाजाला सहज उपलब्ध करून देण्याची कृती सुद्धा एकप्रकारे दानच आहे. म्हणून प्रत्येकाने त्याला जे शक्य आहे, ते इतरांना देण्याच्या प्रवृत्तीची वाढ करणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकामध्ये ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी या शिबिराची मिमांशा विशद करताना सांगितले की, यावेळी पोलिस विभागाने शिबिरार्थीची निवड करताना दूरक्षेत्रातील अगदी नवख्या उमेदवारांची निवड केली. या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्यंत नव्या दमाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. प्रशिक्षणाचे शेड्यूल अगदी काटेकार आणि वेळेचे अपव्यय टाळणारे असेल असे भक्कम नियोजन केले.
एक महिना चाललेल्या या शिबिरात अत्यंत दुर्गम भागातून 65 मुलामुलींची निवड करण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी उमेेदवारांनी सुद्धा आपले दिलखुसाल मनोगत व्यक्त करताना पोलिस विभाग आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आभार मानले. उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी आपण पोलिस प्रशिक्षण केंद्रात नक्की दिसणार, असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे बहारदार संचलन गोदिया मुख्यालयातील महिला हवालदार मंगला प्रधान यांनी केले. उपस्थितांचे आभार देवरीच्या पोलिस उपमुख्यालयातील नक्षलसेलचे पोलिस उपनिरीक्षर बाहकर यांनी मानले.