जिल्ह्यात सुमारे अडीच लाख लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड

0
37

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ शंभर रुपयांत आनंदाचा शिधा

 गोंदिया,दि.१३ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांनी दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाने “आनंदाचा शिधा” दिवाळीपूर्वी वितरित करण्याची योजना आखली असून या अंतर्गत  चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेल्या शिधा जिन्नस संचाचे वितरण जिल्ह्यातील 2 लाख 34 हजार 646 लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

यावेळी खासदार सुनील मेंढे, खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, अभिजित वंजारी, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे सहेसराम कोरेटी, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी लीना फाळके व अधिकारी उपस्थित होते.

          जिल्ह्यात आज घडीला 79 हजार 762 लाभार्थी असून प्राधान्य कुटुंब  01 लाख 54 हजार 702 लाभार्थी असे एकूण 02 लाख 34 हजार 464 लाभार्थ्यांना 02 लाख 34 हजार 464 शिधा जिन्नस संचाचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन पुरवठा विभागाने केले असून वेळेत वितरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

          पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना “आनंदाचा शिधा” संचाने वितरण जिल्हा नियोजन समिती बैठकीत करण्यात आले आहे.

 या शिधा जिन्नस संचात एक किलो रवा,एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल इत्यादी साहित्याचा समावेश असून प्रति संच 100 या दराने वितरण होणार आहे. आनंदाचा शिधा या योजनेचा सर्व पात्र लाभार्थी ह्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व लीना फाळके यांनी केले आहे.