रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन – राजेंद्र जैन

0
23

कुडवा लाईन परिसरातील पादचारी रेल्वे पूल सुद्धा बंदच

गोंदिया- शहरातील लोकांना उत्तर – दक्षिण भागाला जोडणारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडण्यात आला. त्यामुळे शहरातील वाहतूक ही अंडरग्राऊंड मार्गे सुरु आहे. पण या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून शहरवासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ही समस्या त्वरित मार्गी न लावल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आ. राजेंद्र जैन व राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे काम अर्धवट आहे. तर हा पूल केव्हा पूर्णपणे पाडण्यात येईल हे निश्चित नसून काम केव्हा सुरु होईल हे देखील निश्चित नाही. या उड्डाणपूल अभावी रेलटोली व रिंग रोड परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी फारच त्रास सहन करावा लागत आहे. याचा स्थानिक व्यापारावर सुद्धा परिणाम झाला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सुध्दा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तर कुडवा लाईन परिसरातील रेल्वेचा पादचारी पूल सुद्धा मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सध्या अंडरग्राऊंड पुलाखालून वाहतूक सुरु आहे. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहतूक करावी लागत आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरु करणे आणि कुडवा लाईन परिसरातील पादचारी पूल त्वरित सुरु करावे यासंदर्भात अनेकदा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय, केंद्र व राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. तर मागील तीन चार महिन्यांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी खासदार प्रफुल पटेल हे दिल्ली येथे या विषयाच्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या समस्या शासनाने त्वरित मार्गी न लावल्यास या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासाठी १५ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी व रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन देण्यात येणार आहे. यात विधार्थी, व्यापारी सर्व सामान्य नागरिकांना सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.