क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज- जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
17

“टीबी फोरमची आढावा बैठक”

  गोंदिया दि. 17: प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र बनवुन क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून  नागरिकांनी यासाठी समोर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे. 16 नोव्हेंबर  रोजी  जिल्हाधिकारी नयना गुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय टिबी फोरम समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. सदर सभेमध्ये प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते.

          जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन एस. कापसे यांनी टिबी फोरमचे महत्व व कार्य यावर आधारित सादरीकरण केले. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येणारे सर्व निर्देशांकांची माहिती दिली.  शासकिय योजना क्षयरुग्णापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.

 शासकिय वैद्यकिय अधिकारी, खाजगी वैद्यकिय व्यावसायीक व तालुका आरोग्य अधिकारी यांना टिबी नोटीफिकेशन व इतर सर्व निर्देशांकात वाढ व्हावी असे सांगितले. सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच शासकिय आरोग्य संस्थेतील तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आपल्या अंतर्गत उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळणे करिता प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद ही निक्षय या प्रणाली मध्ये करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

          क्षयरुग्णाची नोंद करण्यासाठी (नोटीफिकेशन) करिता पाचशे रुपये इतके अनुदान देण्यात येतो. तसेच क्षयरुग्णाच्या उपचाराअंती आउटकमची नोंद केल्यानंतर रु. पाचशे अनुदान देण्यात येते. करिता वेळेवर क्षयरुग्णाची नोंद निक्षय पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. तरी सर्व क्षयरुग्ण निदान करणा-या व क्षयरुग्णास उपचार देणाऱ्या आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थेचे नाव निक्षय प्रणालीमध्ये नोंदवुन क्षयरुग्णांची नोंदणी करावी व बँक खात्याबददल माहिती घेवुन निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.

          सदर सभेमध्ये सर्व क्षयरोग संबंधिच्या प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे तसेच संपूर्ण कालावधीचा उपचार हा शासकिय आरोग्य संस्था तसेच शासकिय प्रयोगशाळांमध्ये विनामुल्य केला जातो व त्या सोयी सुविधांची क्षयरुग्णांनी उपयोग करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले. प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्राची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी विविध विभागातील खाजगी संस्था, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब व इतर सामाजीक संस्था यांच्या मार्फत पोषण आहार पुरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

 संपुर्ण जिल्हयामध्ये त्याठिकाणी सर्व तालुक्यातील कर्मचा-यांनी बॅनर व स्टिकर चिटकवून क्षयरोग कार्यक्रमाची व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यात यावी. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेतांनी व सभा घेतांनी टीबी चॅम्पियन यांचा सहभाग घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. सभेकरिता जिल्हा क्षयरोग अधिकारी, माता – बाल संगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व कार्यक्रम समन्वयक व जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे अधिकारी  व  कर्मचारी  उपस्थित होते.