
नागपूर येथे रजत जयंतीनिमित्त अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन
गोंदिया, -. शहरातील गड्ढाटोली येथील नीरज वर्मा हे जिल्ह्यात मागील 10 वर्षांपासून विज्ञानाचा प्रचार-प्रसार करत आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करत आहेत. दरम्यान, त्यांच्या विज्ञान शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नागपूर येथे आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या रजत जयंती समारंभात नीरज वर्मा व रश्मि वर्मा यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
असोसिएशन फॉर रिसर्च एंड ट्रनिंग इन बेसिक साइंस एज्युकेशन तथा नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रजत महोत्सवानिमित्त अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी मार्ग, रामदासपेठ नागपूर येथे नुकतेच करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रघू ठाकूर होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार कृपाल तुमाने, असोसिएशन फॉर रिसर्च एंड ट्रनिंग इन बेसिक साइंस एज्युकेशनचे संस्थापक सचिव सुरेश अग्रवाल, विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पाराशर, एसओए युनिव्हर्सिटीचे प्रो. वाईस चांसलर डॉ. अमित बॅनर्जी आदी उपस्थित होते. अपूर्व विज्ञान मेळा नागपूर हे विज्ञानाचा प्रसार-प्रसार सर्वसामान्य लोकांना व विज्ञान शिक्षणाची आवड असलेल्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मागील 25 वर्षांपासून अविरत करीत आहे. या मेळाव्यात देशातील उडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ, दिल्ली, आदी राज्यांसह महाराष्ट्रातील विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे लोक तसेच वैज्ञानिक उपस्थित होते. यावेळी गोंदिया शहरातील नीरज वर्मा व रश्मि वर्मा यांच्याद्वारे जिल्ह्यात विज्ञान शिक्षणाचा प्रचार-प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान क्षेत्राची आवड निर्माण करण्याकरिता मागील 10 वर्षांपासून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनेकांचा सत्कार करण्यात आला. नीरज वर्मा यांच्या सत्कार झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




