
गोंदिया दि. 30: सामाजिक न्याय विभागामार्फत 26 नोव्हेंबर 2022, संविधान दिन ते 6 डिसेंबर 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन समता पर्व आयोजित करण्यात येत आहे. त्यानुषंगाने 28 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे “अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा” या विषयावर संविधान विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राजेश पांडे हे तर प्रमुख अतिथी म्हणून व्ही. आर. ठाकुर उपस्थीत होते. प्रमुख वक्ते डॉ. प्रा. सविता बेदरकर तसेच विश्वजीत बागडे हे उपस्थीत होते.
या प्रसंगी डॉ. प्रा. सविता बेदरकर यांनी “अनुसूचित जाती उत्थान दशा आणि दिशा ” या विषयावर उपस्थित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी -कर्मचारी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनुसूचित जातीतील लोकांची स्वातंत्र्य पुर्वीची दशा आणि स्वातंत्र्य नंतरची दशा यावर त्यांनी प्रकाश टाकला. संविधानातील विविध कलमे व तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. तसेच न्यायाव्दारे आपले हक्क कशा प्रकारे आपणास प्राप्त करता येईल त्यामुळे सामाजिक परिवर्तन कसे होईल यावर विचार व्यक्त केले.
गावपातळीवर संविधान दिवस मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा करुन जनसामान्यामध्ये जनजागृती करता येईल असे प्रतिपादन विश्वजित बागडे यांनी केले. सामाजिक परिवर्तन व मानसिक परिवर्तन याबाबत संविधानजागृतीचे व्याख्यानमाला गावकुसापर्यत पोहचविता यावे असे सांगीतले. त्याव्दारे स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुत्वाच्या आधारे आपणास एक नवीन शुशिक्षीत, सुदृढ समाज निर्मान करता येईल असे ते म्हणाले.
अनु. जाती, दुर्बल घटकासाठी कार्य करीत असतांना त्यांचा आपणास पुर्णपणे अभ्यास असणे आवश्यक आहे असे राजेश पांडे यांनी सांगीतले. अधिकाराची आपणास पुर्णपणे जाणीव असेल तरच आपल्याकडे असलेल्या संधीचा फायदा आपणास घेता येईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती स्वाती कापसे, समाज कल्याण निरीक्षक यांनी तर आभार प्रदर्शन आशिष जांभुळकर, कनिष्ठ लिपीक / संगणक ऑपरेटर यांनी केले. सदर कार्यक्रमास अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.