आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा-नयना गुंडे

0
32
  • अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे भावपूर्ण निरोप

गोंदिया, दि. 18 : धानाचे कोठार, वन समृद्ध, सारस व पक्षी वैभव अशी विविधांगी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात काम करीत असतानाच शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. या काळात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रेम, आपुलकी व माया दिली. प्रशासनात काम करतांना बदली व स्थानांतरण अपरिहार्य बाब असली तरी आपण लोकांप्रती उत्तरदायी आहोत ही बाब विसरता कामा नये, असे भावोद्गार मावळत्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी व्यक्त केले. आदिवासी विकास आयुक्त पदावर बदली झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित निरोप समारंभात त्या बोलत होत्या. वरिष्ठ पदावर काम करतांना आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, पूजा गायकवाड व जिल्हा पुरवठा अधिकारी लीना फलके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती नयना गुंडे यांनी गोंदिया जिल्ह्यातील आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व शासकीय विभागाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

जिल्हाधिकारी म्हणून आपला हा पहिला अनुभव असला तरी सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्हा हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणी काम करतांना अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या महत्वाकांक्षी योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवणे व त्यांचे जीवनमान उंचाविणे ही आपली खरी जबाबदारी आहे. मानव विकास निर्देशांकात सुद्धा आपला जिल्हा मागे आहे. गोंदिया जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आपण एकजुटीने काम करावे असे त्या म्हणाल्या. जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प नेटाने पुढे न्या असा सल्लाही त्यांनी दिला.

            पर्यटन विकासासाठी शासनाने राज्यातील विशेष दहा जिल्ह्याची निवड केली आहे त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. प्रत्येक कार्यक्रम आखतांना पर्यटन विकास डोळ्यासमोर ठेऊनच नियोजन करावे असे त्या म्हणाल्या. गोंदिया जिल्हा अतिशय सुंदर असून या जिल्ह्याच्या खूप आठवणी आहेत. आदिवासी विकास विभागात काम करतांना गोंदियाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावताना अनेक आहुत्या द्यावा लागतात. घर, कुटुंब सांभाळून लोकसेवा करावी लागते. त्यातूनच त्यांच्यातील कर्तव्य निपुणता अधिक बहरत असते. हे सगळे श्रीमती नयना गुंडे यांच्यात आहेत. त्या उत्तम आई, गृहिणी व प्रशासक आहेत. त्यांच्याकडून अनेक बाबी शिकायला मिळाल्या असे भावोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले.

वरिष्ठ पदावर काम करणारे अनेक अधिकारी येतात आणि जातात पण फार थोडे दीर्घकाळ स्मरणात राहतात. नयना गुंडे या केवळ आठवणीतच नाही तर आमच्या हृदयात राहतील. आपल्या स्वभावाची, उत्तम गुणांची व कर्तव्याची छाप अधिकारी, कर्मचारी व जनमानसावर सोडणे खूप कमी अधिकाऱ्यांना जमते. जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती गुंडे यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहील. त्यांनी आईसारखी माया केली. आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती आपल्यापासून दूर जाते आहे.  अशा भावना यावेळी अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. निरोप समारंभाचे संचलन सहायक जिल्हा कोषागार अधिकारी एल. एच. बाविस्कर यांनी केले तर आभार स्मिता बेलपत्रे यांनी मानले. या भावपूर्ण निरोप समारंभास जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.