जानेवारी 2023 पासुन बालकांना पोलिओ पासून संरक्षणासाठी नियमित लसीकरण मध्ये मिळणार वाढीव लसीचे सुरक्षा कवच-जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
31

गोंदिया-शासनाच्या नियमित लसीकरण मोहिमेमध्ये नऊ महिने ते बारा महिने वयाच्या बालकांना पोलिओ पासुन संरक्षणासाठी वाढीव आय.पी.व्ही. डोस मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी  चिन्मय गोतमारे यांनी दिली आहे.
सद्यस्थितित एफ.आय.पी.व्ही. नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर 6 आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच 14 आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण दोन डोस देण्यात येतात. तथापि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 जानेवारी 2023 पासून एफ.आय.पी. व्ही. लसीचा तिसरा डोस नऊ महिने पूर्ण झाल्यावर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
भारता शेजारील पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तान येथे संशयित पोलियो केसेस आढळुन आल्याने त्याचा संसर्ग आपल्या देशात होवु नये यासाठी मोठा बदल शासनाच्या नियमित लसीकरण मोहिमेमध्ये घेण्यात आला आहे. पोलियो उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे व सामूहिक प्रतिकारक शक्ती वाढवणे असा लसीकरणाचा उद्देश असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार यांनी दिली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जानेवारी 2023 पासून हा तिसरा डोस नियमित लसीकरणांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.हा एफ.आय.पी. व्ही. लसीचा तिसरा डोस नऊ महिने पूर्ण झाल्यावर दिला जाणार आहे. सदर डोस हा नऊ ते बारा महिने या वयोगटात गोवर रूबेला डोसच्या पहिल्या डोस बरोबर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी दिली आहे.
याबाबत सर्व स्तरावर वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे.पालकांनी डोस मधील बदल लक्षात घेत मुलांना वयोगटाप्रमाणे त्यांच्या वयाचे सहा आठवडे पूर्ण झाल्यावर, 14 आठवडे पूर्ण झाल्यावर आणि नऊ महिने पूर्ण झाल्यावर पहिला, दुसरा व तिसरा असे एकुण तीन डोस जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन करून घ्यावे असे आव्हान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी केले आहे.