सारस पक्षी संवर्धन मोहिमेंतर्गत जागतिक पक्षी दिनानिमीत्त कृषि सेवा केंद्र धारकांची तालुकास्तरीय कार्यशाळा

0
19

गोरेगाव,दि.6 : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी गोरेगाव च्या वतीने दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी जागतिक पक्षी दिनानिमीत्त सारस पक्षी संवर्धन मोहिमेअंतर्गत गोरेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्र धारकांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

          सदर कार्यशाळेत सारस पक्षी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्याची ओळख, सारस पक्ष्याचे अन्न, सारस पक्षीचे नर व मादी ओळख, सारस पक्ष्याचे संवर्धन करतांना महत्वाच्या सेंद्रिय घटकाचे महत्व व वापर रासायनिक किटकनाशक बुरशीनाशक यांचा भात शेतीत वापर करतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करुन केंद्र शासनामार्फत बंदी घालण्यात आलेल्या किटकनाशक विषयी सविस्तर माहिती दिली.

           मुकुंद धुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्यात व सलग्न लागून असलेल्या राज्यातील उपलब्ध असलेल्या सारस पक्ष्याची संख्या व त्यांच्या विविध प्रजातीची ओळख पटवून तसेच सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले धोका लक्षात घेवून सारस संवर्धन विषयी जी चळवळ सुरु करण्यात आलेली आहे, त्या मोहिमेअंतर्गत कृषि केंद्र धारकांनी ज्या किटकनाशकावर केंद्र शासनानी बंदी घातलेली आहे, परंतु ते किटकनाशक बुरशीनाशक शेतकरी व शेतमजूर अतोनात किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक वापरत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सेंद्रिय शेती घटकाचा सेंद्रिय किटकनाशकाचा वापर करुन पाणी, पक्षी, जमीन, विषमुक्त अन्न तयार करण्याचे काम शेतकरी व कृषि सेवा केंद्र व कृषि विभाग, वन विभाग, मत्स्य विभाग, पशु संवर्धन विभागानी गावा-गावात सारस पक्षी संवर्धन विषयी मोहिम हाती घेऊन सेंद्रीय शेती करुन सारस पक्षी संवर्धनास हातभार लावण्यात मदत करण्याविषयी मार्गदर्शन केले.

        यावेळी तालुका कृषि अधिकारी गोरेगाव सुलक्षणा पाटोळे, कृषि अधिकारी एन.एम.हरिणखेडे, मंडळ कृषि अधिकारी ए.पी.आघाव, सी.बी.कारेजेकर, कृषि पर्यवेक्षक श्रीमती पी.एस.रहांगडाले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गजानन पटले यांच्यासह तालुक्यातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व कृषि सेवा केंद्र धारक उपस्थित होते.

         तालुका कृषि अधिकारी सुलक्षणा पाटोळे यांनी सारस पक्षी संवर्धन मोहिम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांचे सामाजिक दायित्व असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले.