25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी विशेष अभियान राबवा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी विशेष अभियान राबवा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
28

* आरोग्य सेवेचा आढावा

* दुर्गम भागात घरपोच सेवा द्या

          गोंदिया,दि.15 : जिल्ह्याच्या दुर्गम, आदिवासी व डोंगराळ भागात आरोग्य सेवा घरपोच देण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आरोग्य विभागाला केल्या. आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

        जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प विकास राचेलवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, डॉ. सुतार, डॉ. साजिद यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नवसंजीवनी योजना, लसीकरण, महिला व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आजार व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा आढावा घेण्यात आला.

       आदिवासींना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देणे व आरोग्यात सुधारणा करणे, या योजनेच्या माध्यमातून आदिवासींचे क्रियाशील आयुष्य वाढविणे, बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा नवसंजीवनी योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असे जिल्हाधिकारी श्री. गोतमारे यांनी सांगितले.

         दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी बांधवांना नियमित आरोग्य सेवेचा लाभ देणे आवश्यक असून जे नागरिक आरोग्य केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत अशा आदिवासींना घरपोच आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले. बालमृत्यू व मातामृत्यू तसेच कुपोषण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. त्यासाठीचे नियोजन तयार करून तातडीने अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

        आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के तपासणी, महिलांची गर्भधारणा पूर्व तपासणी व समुपदेशन, प्रथिनेयुक्त आहाराबाबत जागृती, दुर्गम भागात घरपोच आरोग्य सेवा व अति जोखमीच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

        नियमित लसीकरण मोहिमेचा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला. १५ ते २५ जानेवारी दरम्यान लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मागील वेळी जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले होते. यावेळी सुद्धा शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयापेक्षा शासकीय रुग्णालयात अधिक लसीकरण होते ही बाब लक्षात आणून दिली असता खाजगी रुग्णालयाचा स्वतंत्र आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयात होणाऱ्या लसीकरणाचे मॉनिटरिंग करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

        प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत गोंदिया जिल्ह्याने १०१ टक्के उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. या योजनेत १ लाख ५० हजार २०० लाभार्थ्यांच्या खात्यात २४ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले.

        राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मौखिक आरोग्य योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. शासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांनी व्यसनापासून दूर रहावे व आपले आरोग्य जपावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.