वनकर्मचार्‍यांकडून बेदम मारहाण

0
12

केशोरी : जंगलात वनवा लावण्याच्या संशयावरून काहीच दोष नसताना येथे राहणार्‍या भास्कर गणू बोरकर याला वनकर्मचार्‍यांनी जबर मारहाण केली. ही घटना १५ रोजी सायंकाळी ४वाजता आंभोरा जंगलात घडली. या घटनेसंदर्भात वनकर्मचार्‍यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन माजी जि.प.सदस्य प्रकाश पाटील गहाणे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वनक्षेत्राधिकारी विजय गंगावणे यांचेकडे दिले. यावेळी चेतन दहीकर, तंमुस अध्यक्ष योगेश नाकाडे व विविध पक्षांचे कार्यकर्ते ऊपस्थित होते
तक्रारीवरून पोलिसांनी दोन वनकर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, केशोरी येथील भाष्कर गणू बोरकर (५0) हा इसम काही कामासाठी जंगलात गेला असता वनरक्षक एम.के.मडावी आणि सय्याम यांनी त्याला पकडून कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता जंगलात वनवा लावण्याच्या संशयावरून हातातील कुर्‍हाडीच्या दांड्याने त्याच्या पायावर व पाठीवर जबर मारहाण केली. त्यामुळे त्याला जबर मोठी दुखापत झाली.
गावापर्यंत येताना त्याला मार असह्य झाल्याने घडलेला प्रकार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश नाकाडे यांना कथन केला. त्यांनी ताबडतोब त्याला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देऊन औषधोपचार केला. या प्रकरणाची माहिती वनक्षेत्राधिकारी विजय गंगावणे यांना दिली. शेवटी तोंडी तक्रारीवरून आणि वैद्यकीय अभिप्रायावरुन वनरक्षक एम.के. मडावी आणि सय्याम यांचेविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.