तरूण पिढीने शहरी नक्षल संघटनांपासून सावध व्हावे-विशेष पोलिस महानिरीक्षक कदम

0
28

 

 पोलिसांनी प्रबोधनावर भर देण्याची गरज
 नक्षल विरोधी प्रशिक्षण कार्यशाळेतील मत

नागपूर, दि. १८ – विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तरूण पिढीला नक्षल संघटनेत सहभागी करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नक्षल चळवळीचे जाळे पसरविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. हिंसेवर विश्वास ठेवणा-या या चळवळीपासून तरूण व महाविद्यालयात शिकणा-या तरूणांनी वेळीच सावध होऊन स्वतःला दूर ठेवावे. त्याकरीता पोलिसांनी तरूण पिढीचे सतत प्रबोधन करून त्यांना नक्षल चळवळीकडे जाण्यापासून रोखावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी आज येथे केले.
विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय, नक्षल विरोधी अभियान व अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित ‘नक्षल विरोधी प्रशिक्षणङ्क कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शमशेर सिंग, उपप्राचार्य तथा पोलिस उपअधिक्षक राजन पाली, नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस उपअधिक्षक श्री. संजीव म्हैसेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यभरातून आलेल्या नक्षल सेलमधील अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना पोलिस महानिरीक्षक कदम म्हणाले, दुर्गम भागातील आदिवासी नागरीकांपर्यंत शासनाचा विकास पोहचू लागला आहे. नक्षल्यांची चळवळ दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे. शिक्षण घेणा-या तरूण पिढीने नक्षलवादाला नकार दिला आहे. तसेच नक्षल चळवळीत भ्रमनिरास झाल्याने बरेच नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत. त्यातच आदिवासी जनता नक्षलवाद्यांच्य पाठीशी राहिलेली नाही. त्यामुळे नक्षल्यांनी तरूण पिढीला नक्षल चळवळीत भरती करण्यासाठी सध्या शहरी मार्ग चोखाळण्यास सुरूवात केली आहे. शहरी भागात काम करणा-या नक्षल समर्थक संघटना स्थानिक समस्या पुढे करून तरूणांमध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द भडकविण्याचे काम करीत आहेत. अशाप्रकारे काही तरूण त्यांच्या जाळ्यात अडकून नक्षल चळवळीत भरती झालेले आहेत.
हिसेंच्या बळावर काम करणा-या नक्षल चळवळीने मागील चाळीस वर्षे आदिवासी बांधवांची केवळ दिशाभुल केली आहे. त्यांना विकासाचा कुठलाही मार्ग दाखविलेला नाही. त्यामुळे आदिवासी जनतेच्या मनातून नक्षल्यांविषयी असलेले विश्वास आता ओसरू लागला आहे. आदिवासी बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे ते आदिवासी बांधवांच्या हत्या करून त्यांना भीतीयुक्त वातावरणात जगण्यास भाग पाडू लागले आहेत. जंगलांच्या क्षेत्रात आपले वर्चस्व कमी होत असल्याची भीती नक्षल्यांना कायम सतावत आहे. त्यामुळे त्यांनी शहरी भागांवर आपले लक्ष केंद्रीत

केले आहे. विविध महाविद्यालयातील तरुणांकडे त्यांनी आपले लक्ष वळविले आहे. त्यामुळे तरूणांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. नक्षल सेल मध्ये काम करणा-या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी असे तरूण आढळून आल्यास त्यांचे प्रबोधन करावे. तसेच त्यांना नक्षली विचारांपासून दूर राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन कदम यांनी यावेळी केले.
यावेळी पोलिस निरीक्षक श्री. डी.एन.ढवळे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. संदीप धांडे, श्री. मनोज बहुरे, पोलिस उपनिरीक्षक अशोक रूपनारायण, श्री. सुजीत पांडे यांच्यासह राज्यातील नक्षल सेलमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.