पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळणेसाठीची सुविधा आता गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध

0
31

• आयपीपीबी खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक

गोंदिया,दि. 2 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात रु. २ हजार या प्रमाणे वर्षाला रु. ६ हजार अनुदान देण्यात येते. या योजनेच्या तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याचा लाभ मिळणेसाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ७२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडलेली नाही. यात गोंदिया जिल्ह्यातील २७ हजार २०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आयपीपीबी मार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक (IPPB) तर्फे गावात येऊन सदरील सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेलेले नाही त्यांचे खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल.

१ ते १२ फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहीम

• पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील पोस्टमास्तर या लाभार्थीना संपर्क करून इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक मध्ये बँक खाती सुरु करतील. योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक मार्फत १ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यात व गोंदिया जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे.

• इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्याचे बँक खाते उघडावे असे आवाहन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

• आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेयमेंट बैंक मध्ये बैंक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. या सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोंदिया डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक आशिष बनसोड यांनी केले आहे.