जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पुतळा जुना पारडी चौकात उभारा

0
12

श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र ची राज्य सरकारकडे मागणी

नागपूर दि.२ (प्रति): नागपूर येथील संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्रच्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्याने संत तुकाराम महाराज यांचा पुतळा जुना पारडी चौकात स्थापित करण्याची मागणी आज राज्य सरकारकडे केली आहे. ही मागणी संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शुभाष घाटे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने या संदर्भातील एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे . जिल्हाधिकारी इटनकर यांच्या मार्फत हे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले.

जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुशिष्याचे संबध होते आणि हे दोन्ही संत महाराष्ट्रातील लोकांचे श्रद्धास्थान आहेत. म्हणून ज्या प्रमाणे पुणे शहरात संत तुकाराम महाराज आणि छ.शिवाजी महाराज यांच्या नावे “ भक्ती-शक्ती चौक “ आहे, त्याच धर्तीवर नागपूर शहरात भव्य चौकाची निमिती करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाने भांडे प्लॉट चौकाचे “ गुरु-शिष्य चौक “ असे नामकरण नागपूर मनपाने करून त्या ठिकाणी सुद्धा गुरु-शिष्यांचा पुतळा स्थापन करावा. तसेच जगतगुरु संत तुकाराम महाराज व अन्य लोकप्रिय संतांच्या नावे अपमानजनक व अवमान होईल असे वक्त्यव्य कुण्याही व्यक्ती किंवा संस्थांद्वारे केल्या गेल्यास अशांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाने कायदा करावा. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त शासकीय कार्यालयात कार्यक्रम घेण्यात यावा. सोबतच बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.

संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलेल्या शिष्टमंडळात मंगेश सातपुते, प्रवीण बावनकुळे,गणेश हांडे, गजानन दांडेकर,अनिल साठवणे, भास्कर भनारे,पंकज सावरकर,मंगेश बाराई, संजय फटिंग,अनिल गुजारकर, आशीष भनारे, गिरीश महाजन व सुभाष ढबाले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.