पीडब्लूडी विभाग 2 च्या गोंधळामुळे बाघनदीवरील पुलाचे बांधकाम रखडले

0
21

सालेकसा- तालुक्यातील बोदलबोडी ते भजेपार दरम्यान बाघनदीवर पूल बांधकामाचे भूमिपूजन वर्षभरापूर्वी झाले असले तरी प्रत्येक्षात बांधकामाचा मुहुर्त निघाला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.बांधकामला सुरूवात करावी, आवागमनास होणार्‍या त्रासातून परिसरातील जनतेची मुक्तता करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तालुका आदिवासी,जंगलव्याप्त,दुर्गम नक्षलप्रभावी आहे.आजही येथे दळणवळणासह आरोग्य,उच्च शिक्षणाच्या
सोयी सुविधा नाहित.बोदलबोडी-भजेपार हा महत्त्वाचा मार्ग आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 अंतर्गत हे काम येत असून या विभागातील अधिकारी हे आदिवासी भागातील अंतर्गत रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष देण्यात व्यस्त असून महत्वाचा व 12 गावांचा संपर्क सालेकसा तालुकामुख्यालयाशी होणार्या या पुलाच्या बांधकामाला प्राधान्य देत नसल्याने यावर्षीही या परिसरातील गावांना पावसाळ्यात पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे.

या मार्गावरील बाघनदीवर पूल बांधकामासाठी क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कडून 6 कोटी रुपये मंजूर करून घेतले.गतवर्षी 28 फेब्रुवारी रोजी पुल बांधकामाचे भूमिपूजनही झाले.परंतु,एक वर्षाचा कार्यकाळ लोटत असताना पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही.यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.बाघनदीवर पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे,अशी मागणी भजेपारचे सरपंच
चंद्रकुमार बहेकार,देवेंद्र पटले यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे.बाघनदीवर पूलाचे बांधकाम व्हावे यासाठी परिसरातील 12 ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन शासनाकडे पाठविला होता.तसेच सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाकडे निवेदना द्वारे पाठपुरावा केला.नागरिकांची गरज लक्ष्यात घेत तत्कालीन शासनाने बांधकामास मंजूरी प्रदान करून निधिची तरतूद केली.थाटात भुमीपूजनही झाले.या नंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर झाले आणि माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक आतापर्यंत पुलाचे बांधकाम सुरूच झाले नाही.यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे.