युवक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे – प्राचार्य डॉ. कोकोडे

0
26

 निमगाव येथे रासेयो राज्यस्तरीय शिबिराचा समारोप
अर्जुनी मोर–भारत हा तरुणांचा देश आहे. परंतु हा युवक आज गोंधळलेल्या स्थितीत आहे.याची कारणेही अनेक आहेत. कौशल्यपूर्ण शिक्षण नसणे, रोजगाराच्या पुरेशा संधी नसणे आणि रोजगार कुठे व कसा मिळतो याचे ज्ञान नसणे. याचा परिणाम युवकांच्या अंगी सर्व प्रकारच्या क्षमता साठविलेल्या असूनही त्या ओळखता न आल्याने तो भरकटतो आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश श्रमसंस्कार हा असून युवकांना श्रम करण्याची लाज वाटता कामा नये.जे युवक उच्चशिक्षित आहेत त्यांना फक्त सरकारी नोकरी हा एक रोजगाराचा मार्ग वाटतो, परंतु असे नाही. या देशातील शेती सुपिक आहे. देशात सूर्यप्रकाश भरपूर आहे, पाण्याची कमतरता नाही. असे असताना युवक नोकरी मिळत नाही म्हणून निराश होतो आहे.तो विचलित झालेला आहे. परंतु युवकांनी आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर केला पाहिजे,राष्ट्रीय सेवा योजना हे युवकांच्या उन्नतीचे साधन आहे,असे प्रतिपादन शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोर. द्वारा आयोजित सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. कोकोडे बोलत होते.
शिबिराच्या समारोपीय समारंभाचे अध्यक्ष श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुणकरण चितलांगे, प्रमुख अतिथी फुलचंद मेश्राम, सरपंच श्रीमती बंदेश्वरी राऊत, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहूर्ले, डॉ. सिबी यांचीही समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाला श्री. दुर्गा शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ. गाडेकर, मुख्याध्यापक बी एम ब्राह्मणकर, पोलीस पाटील संजय कापगते, डॉ शरद बेलोरकर, डॉ. बबन गायकवाड, रा.से.यो. जिल्हा समन्वयक डॉ प्रविण चंद्रगिरीवार आदी उपस्थित होते. विविध उपक्रमात उत्कृष्ट सहभाग व कार्य करणाऱ्या शिबिरार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व शिबिरार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिराला निमगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. दुष्यंत बनपुरकर, से.नि. नायब तहसीलदार गजानन पुसतोडे, डॉ. अनिल गायकवाड तसेच नवयुवक बहुउद्देशीय मंडळ निमगाव यांनी विशेष सहकार्य केले. निमगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती वंदेश्वरी राऊत, उपसरपंच श्री संदिप पुस्तोडे, सर्व सदस्य व कर्मचारी, गावातील विविध मंडळाचे सदस्य व ग्रामवासी यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, शिबिर प्रमुख डॉ. मोतीलाल दर्वे, शिबिर संयोजक डॉ. प्रदीप भानसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास लोखंडे, प्रा. राजेश डोंगरवार तसेच शालिनी गेडाम, विशाल कोल्हे, यामीना नागोसे, गिरीश ठोंबरे, वैष्णवी बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारत राठोड यांनी तर आभाप्रदर्शन डॉ. मोतीलाल दर्वे यांनी केले. राष्ट्रवंदनेने शिबिराची सांगता झाली.