जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

0
16

गोंदिया, दि.21 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ तसेच होप फाउंडेशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी  जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जैन कुशल भवन, गोंदिया येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी. वानखेडे होते. यावेळी जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड. आरती भगत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सकलेश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर संगीता साळवी तसेच प्राध्यापिका माधुरी नासरे उपस्थित होत्या.

          न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी समाजात महिला सुरक्षेबद्दल तसेच त्यांचे हक्क व कर्तव्य याविषयी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.  प्रत्येक स्त्रीने आपल्या अधिकाराची जाणीव ठेऊन आपल्या कर्तव्याबद्दल समाजामध्ये मानाचे स्थान मिळवायला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. संविधानाने त्यांना प्राप्त करून दिलेले अधिकार याचा उपयोग करून त्या  पुरुषांच्या बरोबरीने उभे राहत आहेत असे त्यांनी सांगितले.

           कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांनी महिलांना समाजामध्ये असलेले स्थान व त्यांना दिले गेलेले अधिकार याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शबाना अन्सारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मंगला बनसोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.