पोहरादेवी व उमरी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामे तातडीने सुरु करण्याचे नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड

0
16

वाशिम, दि. 24 : श्रीक्षेत्र पोहरोदवी येथील श्री. संत सेवालाल महाराज तिर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातंर्गत करण्यात येणारी सर्व कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्यासाठी   तातडीने सुरु करण्याचे नियोजन करा. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

          23 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथील नंगारा वास्तू संग्रहालय येथे श्री. संत सेवालाल महाराज तिर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पोहरादेवी व उमरी विकास आराखडयाशी संबंधित कामाबाबत आयोजित आढावा सभेत पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. सभेला राज्याचे माजी पोलीस महासंचालक तथा गुरुव्दारा बोर्ड, नांदेडचे प्रशासक डॉ. पी.एस. पसरीचा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, प्रसिध्द वास्तू विशारद अमरदिप बहल, गुरुव्दारा बोर्ड, नांदेडचे संचालक श्री. जसबीरसिंग, यवतमाळचे डॉ. टी.सी. राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड, महावितरणचे अधिक्षक अभियंता मंगेश वैद्य व जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

         पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, उमरी आणि पोहरादेवी येथे तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामे करण्यासाठी संबंधित जागा मालकांकडून संमतीपत्रे घेण्यात यावी. शासकीय जमीनीवर ज्या ठिकाणी महावितरण, सहकार व ग्रामपंचायत विभागाची कार्यालये व इमारती आहेत त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विकास आराखडयासाठी ज्या शासकीय जमीनीचे अधिग्रहण करावयाचे आहे, त्या जागांची मोजणी करुन विकास कामे करण्याच्या दृष्टीने त्वरीत नियोजन करावे. विकास आराखडयातील सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण करावी. या कामांमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. असे ते म्हणाले.

          डॉ. पसरीचा म्हणाले, पोहरादेवी आणि उमरी तिर्थक्षेत्र विकास आराखडयासाठी गुरुव्दारा बोर्ड सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत होणाऱ्या कामांमुळे दोन्ही गावाच्या विकासाला चालना मिळेल. ग्रामस्थांना त्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. तिर्थक्षेत्रासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणून पोहरादेवीचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे मोठया संख्येने भाविक आणि पर्यटक पोहरादेवी येथे येतील. विकास अराखडयातंर्गत कामे पुर्ण झाल्यावर त्या वास्तूंचे व्यवस्थापन आणि स्वच्छता कायम ठेवणे हे महत्वाचे काम आहे. लेझर शो, बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केल्यास उत्पन्नाचे साधन त्यामधून उपलब्ध होणार असल्यामुळे मोठया संख्येने पर्यटक पोहरादेवीत येतील. 200 हेक्टरवर वनोद्यान तयार होवून ते विकसीत झाल्यावर मोठया संख्येने दूरवरुन पर्यटक देखील पोहरादेवीला येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         श्री. संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र मुळ मंजूर आराखडा 22 नोव्हेंबर 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये 25 कोटी रुपयांचा होता. 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये 100 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये वाढ करुन तो 167 कोटी 9 लक्ष रुपयांचा सुधारीत आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये प्रदर्शन केंद्र व प्रदर्शन केंद्राच्या सभोवताल फायब्रीकेशनची नंगारा प्रतिकृती, 2 व्हिआयपी कक्ष, कॉन्फरन्स हॉल, ऑडीटोरीयम, ऑफीस, आवार भिंत, परिक्रमा मार्ग, तीन प्रवेशव्दार, अंतर्गत रस्ते, पेव्हींग पार्कींग, जमीन सुशोभीकरण, वाहनतळ, संत सेवालाल महाराज स्मारक व ध्वज, अंतर्गत सजावट, अंतर्गत व बाहय विद्युतीकरण, होणारी भाववाढ व वास्तूशास्त्र प्रक्रीयेसाठी निधी, पाणी पुरवठा व पंप घर, जन सुविधा केंद्र, फिरते प्रसाधन गृह, सोलर उपकरणे लावण्यात येणार आहे. आतापर्यंत आराखडयातंर्गत 44 कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहे. या आराखडयातील सर्व कामे मार्च 2024 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे.

         उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडा 326 कोटी 25 लक्ष रुपयांचा आहे. यामध्ये उमरी व पोहरादेवी येथील मंदिर परिसरात बांधकाम व सुधारणा करणे, भाविकांसाठी विविध सोयीसुविधा, समाधी स्थळांच्या पोचमार्गाचे बांधकाम करणे, पोहरादेवी येथे यात्री निवास व बाहय पाणी पुरवठा योजना, अंतर्गत व बाहय विद्युतीकरण, पाणी पुरवठा तसेच विमा शुल्क, आकस्मिक खर्च, सिटेज चार्ज, जीएसटी शुल्क आणि वास्तू शास्त्रज्ञ शुल्काचा समावेश आहे.

          आढावा सभेत श्री. हिंगे यांनी पोहरादेवी व उमरी येथे विकास परीसरातील उपलब्ध शासकीय जमीनीबाबतची तसेच अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेलया खाजगी जमीनीची माहिती दिली. श्री. धोंडगे यांनी पोहरादेवी आणि उमरी विकास आराखडयातंर्गत कामांची संकल्पना व आराखडे तसेच नंगारा वास्तू संग्रहालय परिसरातील प्रगतीपथावर कामे तसेच उर्वरीत कामे पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी श्री. संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडयाचे चित्रफितीव्दारे सादरीकरण उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आले.

        यावेळी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, कारंजाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी धीरज मांजरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. राऊत, उपविभागीय अभियंता निलेश राठोड, मानोरा उपविभागीय अधिकारी श्री. खोडे, तहसिलदार ज्ञानेश्वर घ्यार, सहायक उपवनसंरक्षक विपूल राठोड, तालुका भूमि अभिलेख उपअधिक्षक श्री. आडे यांची उपस्थिती होती.