पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘समता’ दिनदर्शिकेचे प्रकाशन  

0
5

वाशिम, दि. 24 : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 अंतर्गत तयार केलेल्या निवडक महत्वपूर्ण बारा योजनांची माहितीचा समावेश असलेल्या ‘समता’ सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व यवतमाळ येथील डॉ. टी.सी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

         ‘समता’ दिनदर्शिकामध्ये सन 2023 मध्ये महिनानिहाय आलेल्या शासकीय सुट्टयांचा समावेश आहे. ‘समता’ दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असून मध्यभागी समाज कल्याण विभागाचे बोधचिन्ह दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि जिल्हयाच्या स्थापनेला यावर्षी 25 वर्ष पुर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवी बोधचिन्ह असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संजय राठोड यांचे छायाचित्र आहे.

         दिनदर्शिकेत जानेवारी महिन्यात मार्जिन मनी योजना, फेब्रुवारी – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मार्च – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एप्रिल – अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, मे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, जून – अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, जुलै – आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, ऑगस्ट – मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहे, सप्टेंबर – अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, ऑक्टोबर – राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, नोव्हेंबर – शेळी गट वाटप योजना आणि डिसेंबर महिन्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या योजनांची थोडक्यात माहिती दिली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती थोडक्यात नमुद केल्या आहे. दिनदर्शिकेत असलेल्या योजनांच्या माहितीमुळे अनेकांना योजनांची माहिती मिळून भविष्यात लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता येईल. असे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी सांगितले.