राज्यात २५५० चौ. किमी. वनक्षेत्रात वाढ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
13

मानव विकास, डोंगरी विकासच्या धर्तीवर वनग्राम विकास योजना

चंद्रपूर, दि. 25 : ‘वन से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ हे केवळ वनविभागामुळेच शक्य आहे. निसर्गाचे संरक्षण करून ईश्वरीय कार्य करण्याचे काम आमचा विभाग करतो आहे. वन अधिकारी, कर्मचारी, वनमजूर आणि विशेष म्हणजे गावक-यांच्या सहकार्यामुळेच राज्यात 2550 चौ. किमी वनक्षेत्रात वाढ करू शकलो, याचा मनस्वी आनंद आहे, असे राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी यावेळी, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, अप्पर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, चंदनसिंह चंदेल उपसंचालक कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे, सैनिकी शाळेचे प्रशासकीय अधिकारी देवाशिष जीना, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तसेच सरपंच, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

काँक्रीटच्या जंगलापेक्षा निसर्गाच्या जंगलात राहणारे जास्त नशीबवान आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ईश्वरीय कार्य करण्याचे काम वनविभाग करतो. या विभागाचा मंत्री होणे हे आपले सौभाग्य आहे. गत कार्यकाळात राज्याचा अर्थमंत्री म्हणून देशात सर्वोत्तम 11975 हजार कोटींचा सरप्लस अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. वनमंत्री आणि धनमंत्री असल्यामुळेच असा सरप्लस अर्थसंकल्प मांडू शकलो. राज्यात सर्वांच्या सहकार्याने वनक्षेत्रात वाढ झाली असून ती तब्बल 2550 चौ. किमी आहे. तसेच देशात महाराष्ट्राने सर्वात जास्त मँग्रोजचे क्षेत्र वाढविले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याची दखल घेतली असून महाराष्ट्राच्या या अभिनव प्रकल्पाचे केंद्राने कौतुक केले आहे. तेंदुपत्ता हा रोजगाराचा एक घटक आहे. रॉयल्टी बोनस देतांना केवळ 25 टक्के निधी देण्यात येत होता. मात्र वनमंत्री म्हणून आपण आस्थापनेचा खर्च कमी करून तेंदुपत्ता बोनससाठी 72 कोटींची तरतूद केली आहे.

वन्यजीव – मानव संघर्षात वाढ झाली आहे, हे मान्य करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांना 2 लक्ष वरून आता 20 लक्ष रुपयांची मदत वाढविण्यात आली आहे. मात्र, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युच होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांच्याशी चर्चा सुरू असून वन्यप्राणी जेव्हा गावात येतात, त्याची पूर्वकल्पना देता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. 80 टक्के मृत्यु हे जंगलात होतात. त्यामुळे गावक-यांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करावे लागेल. यासाठी स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबत काम सुरू आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राज्याने राबविली. यामुळे गावांची गरज पूर्ण होत आहे. मात्र रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच आता मानव विकास आणि डोंगरी विकास योजनेच्या धर्तीवर वनग्राम विकास योजना राबविण्याचा संकल्प आपण केला आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात येईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धर्तीवर आता फॉरेस्ट औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) नागपूर आणि चंद्रपूर-गडचिरोलीच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. एफआयडीसीच्या माध्यमातून वनांवर आधारीत उद्योगांना मदत होऊ शकेल. एवढेच नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान, मार्केटिंग आदी प्रशिक्षण देणे शक्य होईल. चंद्रपूर येथील एमआयडीसी मध्ये 20 एकर जागेवर वनांशी संबंधित कौशल्य विकासाचे केंद्र उभारण्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंजुरी दिली आहे.

निसर्गाच्या संरक्षणाबरोबरच हे पृथ्वीचे संवर्धन करण्याठी वन विभागाने अधिक चांगले काम करावे. जंगलात काम करणा-या वन कर्मचा-यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी चंद्रपुरातील धनराज भवन समोर वातानुकूलित वसतीगृह तयार करण्यासाठी वन अधिका-यांनी गांभिर्याने लक्ष द्यावे. वनांची सेवा करणा-यांच्या आयुष्यात धनाची कमतरता कधीही पडू नये, अशी अपेक्षा वनमंत्र्यांनी व्यक्त केली.

खासदार बाळू धानोरकर म्हणाले, वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ताडोबाचे महत्व जगात अधोरेखीत केले. वन्यजीव –मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने विशेष प्रयत्न करावेत. गावातील लोकांच्या रोजगारासाठी बफर क्षेत्रातील जास्तीत जास्त गेट उघडावे. तर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जिल्ह्यात वन पर्यटनातून रोजगार उपलब्ध होत आहे. औद्योगिक पर्यटनालाही येथे वाव आहे. ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून वनलगतच्या गावांना आर्थिक मदत व गावक-यांचा सत्कार ही वनमंत्र्यांची उत्कृष्ट संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचा सत्कार व धनादेश वितरण : व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील मामला, बोर्डा, निंबाळा, चोरगाव, चेकबोर्डा व हळदी तसेच वायगाव, पाहामी, दुधाळा, झरी, घंटाचौकी व चेकनिंबाळा या ग्राम परिस्थितीकीय विकास समितीस 3.50 लक्ष रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच मामला, खडसंगी,  मुल, मोहर्ली बफर झोन व अलिझंजा या उत्कृष्ट ग्राम परिस्थितीकीय समितीचा सन्मान करून 25 हजार रुपयाचा धनादेशाचे वाटप करण्यात आले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक बचाव दलांना पुरस्कार वितरण : पडझरी, निंबाळा, सितारामपेठ, कुकूडहेटी व वडाळा येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक बचाव दलांना 25 हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

बफर क्षेत्रातील 10वी व 12वी वर्गातील विद्यार्थ्यांना संगणक वितरण : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या 35 विद्यार्थ्यांना टॅब व लॅपटॉप वितरीत करण्यात आले. यामध्ये दहावीतील श्वेता ताजने, रश्मी दुर्योधन, समीर गेडाम, समीक्षा कस्तुरे या विद्यार्थ्यांना टॅबलेट तर बारावीतील भाग्यश्री ढोणे, नलिनी चांदेकर व निलेश गेडाम यांचा समावेश होता.

शालेय मुलींना सायकलचे वाटप : वनक्षेत्र लगतच्या भोसरी व खुटवंडा या गावातील 5वी ते 10 वीच्या 26 मुलींना प्रतिनिधिक स्वरूपात सायकलचे वाटप करण्यात आले.

उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार : जंगलावरील निर्भरता कमी व्हावी व रोजगार प्राप्त व्हावा यादृष्टीने व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रातील एकूण 22 युवक निसर्ग मार्गदर्शक म्हणून विभागात कार्यरत आहे. त्यामध्ये वसंत शंकर सोनुले (मोहर्ली कोअर गेट), मंगेश पांडुरंग नन्नावरे (कोलारा गेट), रामराव सखाराम नेहारे (नवेगाव गेट), अरविंद चौखे (अलिझंजा गेट) तर भीमा मेश्राम जुनोना (बफर) या निसर्ग मार्गदर्शकांना उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट होम स्टे पुरस्कार : लेक व्ह्यु, आणि वाघाई होम स्टे मोहर्ली यांना प्रदान करण्यात आला.

ग्रीन रिसॉर्ट पुरस्कार : वाघोबा इको लॉज पगदंडी रिसॉर्ट यास ग्रीन रिसॉर्ट पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय आयसीआयसीआय फाउंडेशन, ॲक्सिस फाउंडेशन, एसबीआय फाउंडेशन, मिटको सोल्युशन, हेमेंद्र कोठारी फाउंडेशन, टायगर रिसर्च कंजर्वेशन ट्रस्ट, महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन, टाटा प्रोजेक्ट मुंबई, महिंद्र हॉलिडे आणि रिसॉर्ट, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, एचडीएफसी कॅपिटल ॲडव्हायझर लिमिटेड, इको-प्रो, सातपुडा फाउंडेशन, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व विवेक गोयंका या संस्थांनासुध्दा सन्मानित करण्यात आले. तर निमढेला येथील पर्यटन व्यवस्थापक स्वर्गीय जितेंद्र नन्नावरे यांच्या कुटुंबीयास 1 लक्ष रु. धनादेश वितरित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात आदिवासी नृत्याने झाली. यावेळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पावर आधारीत माहितीपट दाखविण्यात आला. तसेच ताडोबा डायरीचे विमोचन वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.