तरुणांनी वाय-२० या व्यासपीठावर नाविन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात – विनोद मोहतुरे

0
14
  • जिल्हास्तरीय युवा पडोस संसदचे उदघाटन
  • युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद

       गोंदिया, दि.01 : आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठीचा प्रमुख मंच असलेल्या जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही ऐतिहासिक घटना असून सर्वांच्या कल्याणासाठी जागतिक समस्यांवर व्यवहारिक तोडगा शोधण्याच्या दृष्टीने भारताची ही अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या देशात होऊ घातलेल्या या शिखर परिषदेच्या निमित्ताने व्यापार, हवामान बदल, शास्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आदी विषयांवर सखोल मंथन होऊन धोरण ठरविले जाणार आहे. या प्रक्रियेत युवकांचा सहभाग असावा या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. युवक-युवतींना विविध विषयांवरील आपली धोरणात्मक मते वाय-२० या व्यासपीठावर मांडण्याची संधी उपलब्ध झाली असून युवक-युवतींच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे प्रतिबिंब देशपातळीवर होणाऱ्या परिषदेत नक्कीच उमटेल असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले.

        जी-२० शिखर परिषद अंतर्गत वाय-२० परिषद व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष यावर नेहरू युवा केंद्राच्या वतीने एक दिवशीय जिल्हास्तरीय पडोस युवा संसदचे आयोजन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रभारी कृषी उपसंचालक धनराज तुमडाम, कृषी अधिकारी पवन मेश्राम, प्रा. दिशा गेडाम, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. शेख हुसैन शकील पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रवी गिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून युवा संसदचे उद्घाटन करण्यात आले.

        सप्टेंबर-2023 मध्ये होऊ घातलेली जी-२० शिखर परिषद दिल्लीमध्ये होणार आहे. या शिखर परिषदेमध्ये युवकांना आपली संकल्पना मांडायची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या पडोस संसदमध्ये युवक-युवतींनी आपले विचार मांडायचे आहेत. आपल्या विचारांची संकल्पना प्रदर्शित करायची आहे. या माध्यमातून आजच्या नविन पिढीतील युवकांचे विचार देशाच्या शिखर परिषदेमध्ये पोहोचवावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

         सप्टेंबर-2023 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत २० देशाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. देशाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी युवकांनी मंथन करणे गरजेचे असून आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मांडाव्यात. युवकांच्या नवसंकल्पना धोरण तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. भारताला 1 डिसेंबर 2022 पासून जी-20 चे नेतृत्व करण्याची ऐतिहासिक संधी मिळालेली आहे. ‘वसुधैव कुटूंबकम्’ ही या वेळची संकल्पना आहे. या परिषदेचे यजमानपद स्वीकारल्यामुळे जगात भारताचा मान आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढत आहे. भारताच्या याच जागतिक प्रतिष्ठेचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटत आहे. प्रत्येक युवकांनी वाय-२० च्या माध्यमातून धोरण निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन रवि गिते यांनी यावेळी केले.

         आजची नविन पिढी ही उद्याचे देशाचे भविष्य आहेत. आज जग कुठे चालला आहे, आज आपण कुठे आहोत याचा विचार युवकांनी करायला पाहिजे. आपल्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याव्यतिरिक्त आजच्या युवा पिढीला मोबाईलची गरज आहे. मोबाईलमुळे आपण एक-दुसऱ्यापासून दुरावत चाललो आहे. जगात काय चाललेले आहे ते आपण मोबाईलमुळे बघू शकतो. अतिरेक करणे माणसाला घातक आहे. मोबाईलमुळे युवकांमध्ये विकृती निर्माण होत आहे. युवकांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर योग्य कामासाठी करावा. युवकांमध्ये कौशल्य असायला पाहिजे. आपल्या कौशल्याचा योग्य वापर केला तर आपले भविष्य नक्कीच उज्ज्वल होणार आहे असे धनराज तुमडाम यांनी सांगितले.

          जी-२० हा कार्यक्रम आजच्या नविन पिढीतील युवकांसाठी आहे. या कार्यक्रमामध्ये युवकांना आपल्या कौशल्याचा वापर करुन नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून यात सहभागी व्हायचे आहे. सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेख हुसैन शकील पटेल यांनी यावेळी केले.

       संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा वापर आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश करावा, यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तृणधान्याचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी आरोग्याचा समतोल साधण्यास तृणधान्याची महत्वाची भूमिका आहे. आपल्या रोजच्या आहारात तृणधान्याचा जास्तीत जास्त प्रमाणात समावेश करा व निरोगी राहा असा सल्ला पवन मेश्राम यांनी यावेळी दिला.

         देशाचे प्रतिनिधीत्व करुन आलेल्या संकटाचे निराकरण करण्याची आजच्या युवकांमध्ये क्षमता आहे. आपला मानसिक विकास झाला तर तुमचा सर्वच क्षेत्रात विकास होणार आहे. देशाचा विकास करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. जी-२० शिखर परिषदेमध्ये २० देश सहभागी होणार आहेत. यामध्ये भारताच्या आर्थिक विकासाचे नियोजन करायचे आहे. www.G-20 ही एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये युवकांनी हातभार लावावा असे आवाहन दिशा गेडाम यांनी केले.

         संपूर्ण विश्वात भारतातील पारंपारिक संस्कृती ज्यामध्ये कुटूंबाला अतिशय महत्व आहे. कुटूंबातील ‘अतिथी देव भव्’ ही संकल्पना संपूर्ण जगात रुजविण्यासाठी G-20 व Y-20 या संकल्पनेतून रुजविण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. या माध्यमातून एकप्रकारे भारतीय संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रा.डॉ.बबन मेश्राम यांनी सांगितले.

         नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया येथे करण्यात आले आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे, असे प्रास्ताविकातून नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे यांनी सांगितले.

         खासदार सुनिल मेन्ढे यांनी नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमास भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.

         स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रिया चौधरी या विद्यार्थीनीने लावणीच्या गीतावर नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. एनएमडी महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर केले.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.बबन मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक के.के. गजभिये यांचेसह शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी व एनएमडी महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.