महिलांच्या समस्यांची सोडवणूक तातडीने करावी-आभा पांडे

0
13

महिलांच्या प्रश्नांबाबत आढावा सभा

वाशिम, दि. 01 : महिला व मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग काम करीत आहे. हिंसाचारग्रस्त आणि अत्याचार झालेल्या महिलांच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यात यावी. असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी दिले.

           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात महिलांच्या प्रश्नांबाबत आयोजित आढावा सभेत श्रीमती पांडे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

           श्रीमती पांडे म्हणाल्या, महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी महिलांना एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने वाशिम येथे सुरु करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटरकडे दुर्लक्ष असल्याचे भेटीतून दिसून आले. या सेंटरमध्ये महिला व बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्याचे चांगले काम प्रशासनाने केले आहे. या सेंटरमध्ये महिलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. केवळ इमारत आणि संगणक असून चालणार नाही. सखी सेंटरमध्ये महिलांच्या तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण चांगले आहे. सखी सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे. देहविक्री करणाऱ्या महिलांना इतर व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे न्यायालयात न जाता ती आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे त्या म्हणाल्या.

           मनोधैर्य योजनेतील प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष लक्ष दयावे. असे सांगून श्रीमती पांडे म्हणाल्या, मिशन वात्सल्य समितीकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावी. जिल्हयात बालविवाह होणार नाही यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी गावपातळीवर आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांची मदत घ्यावी. बचत गटातील जास्तीत जास्त महिलांना बँकांकडून उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाने लक्ष दयावे. जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना अडचणी व समस्या उदभवणार नाही, याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दक्षता घ्यावी. महिला पोलीस स्टेशनला तक्रार घेवून आल्यास त्या तक्रारीची त्वरीत दखल घेऊन महिलेला त्वरीत न्याय मिळवून देण्यात यावा. याबाबतचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला दयावे. असे त्यांनी सांगितले.

           शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात याव्या. या समित्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. असे सांगून श्रीमती पांडे म्हणाल्या, त्या सक्षमपणे काम करतील आणि महिलांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करतील. विशाखा समित्या ज्या कार्यालयामध्ये गठीत करण्यात आल्या आहे, त्या समितीचे नामफलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे. महिला आयोगाचा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात लावण्यात यावा. पोलीस विभागाच्या भरोसा सेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात यावी. असे त्या यावेळी म्हणाल्या.

           श्री. षण्मुगराजन म्हणाले, वाशिम येथील वन स्टॉप सेंटर पुर्ण क्षमतेने काम करणार आहे. येथील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयात बाल संगोपन योजनेचा लाभ पात्र बालकांना देण्यात आला आहे. बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांकडे असलेली त्यांचे कर्ज प्रकरणे बँकर्सच्या सभेत तातडीने मंजूर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

           श्री. बच्चन सिंह यांनी सांगितले की, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. जिल्हयात 3700 ठिकाणी क्युआर कोड लावण्यात आले आहे. हे क्युआर कोड शाळा, कॉलेज व निर्जनस्थळी लावण्यात आले आहे. याठिकाणी पोलीसांची नियमित निगराणी राहत असल्यामुळे महिला व मुलींना सुरक्षितता मिळत आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यावर पोलीस विभाग दक्षता घेत असल्याचे त्यांची सांगितले.

           श्री. सुर्यवंशी यांनी वन स्टॉप सेंटर, समुपदेशन केंद्र, देहविक्री करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य, स्थानिक लैंगीक तक्रार निवारण समित्या, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, मनोधैर्य प्रकरणे, मिशन वात्सल्य समिती, बालसंगोपन योजना, बाल कल्याण समिती, बाल विवाह प्रतिबंधक कायदयाअंतर्गत मागील 3 वर्षात केलेल्या कार्यवाहीची माहिती सादरीकरणातून दिली.

           श्रीमती पांडे यांनी वाशिम येथील भेटी दरम्यान जिल्हा कारागृह येथे भेट देऊन महिला बंदिवान यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाची चव देखील घेतली. वन स्टॉप सेंटरला तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयातील भरोसा सेलला देखील भेट दिली. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

           सभेला नागरी बाल विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक श्री. भुरे तसेच जिल्हयातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.