पाण्याचा वापर काटकसरीने करा – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
17
  • जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

 गोंदिया, दि.16 : पाणी हे जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे ही काळाची गरज असल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.

         गोंदिया पाटबंधारे विभागाच्या वतीने 16 ते 22 मार्च या दरम्यान जिल्हाभर जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. जलजागृती सप्ताहनिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी चुलबंद नदी, बाघ नदी व वैनगंगा नदीच्या पाण्याचे जलपुजन व दीप प्रज्वलीत करुन उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

       कार्यक्रमास अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत देशपांडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी देवरी अनमोल सागर, भंडारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता र.पु.पराते, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव कुऱ्हेकर, धापेवाडा उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, पाटबंधारे उपविभाग तिरोडाचे उपविभागीय अभियंता मनमोहन पटले,  पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता श्रेणी-1 संजीव सहारे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता दिलीप चौरागडे व संदिप विभुते, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके यावेळी उपस्थित होते.

          पाणी हा जीवनाचा आधार आहे. ते वाचवायचे असेल तर त्याचे संवर्धन केले पाहिजे. मात्र पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्त्रोत, नदया व जलाशयाचे प्रदुषण रोखणे, पायाभुत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन करण्याबाबत समाजात जागृती व साक्षरता निर्माण करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

         यावेळी जलजागृती सप्ताहनिमीत्त पाण्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन, तसेच पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही याबाबत संयुक्तपणे जलप्रतिज्ञा घेण्यात आली.

        गोंदिया पाटबंधारे विभागाच्या वतीने 16 ते 22 मार्च या दरम्यान जिल्हाभर जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून 16 मार्चला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलपुजन. 17 ते 18 मार्च दरम्यान सकाळी 11 वाजता उपविभाग स्तरावर प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन. 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गोंदिया पाटबंधारे विभाग येथे रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन. 21 मार्चला सकाळी 11 वाजता बोदलकसा मध्यम प्रकल्प (ता.तिरोडा) येथे कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते जलपुजन. 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विभागीय/ उपविभाग स्तरावर समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

       उपस्थितांचे आभार पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी मानले.