नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवा- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

0
13

मतदार याद्या अचूक करण्यावर भर द्या

        गोंदिया दि. १७: आगामी काळात निवडणुका असल्यामुळे प्रशासनासाठी समोरचे सहा-सात महिने तयारीचे राहणार आहे. या काळात अचूक मतदार यादी, नवमतदार नोंदणी, ईव्हीएम करीता गोडावून व्यवस्थापन आदी बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. १८ वर्षावरील कोणताही नागरीक मतदार नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आपापल्या परिसरातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांशी नियमित संपर्क करून मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा सुचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.

        नियोजन सभागृह येथे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी व मुख्य निवडणूक आयुक्तांचे संपर्क अधिकारी विनोद थोरवे तहसीलदार नागपूर ग्रामीण आदी उपस्थित होते.

       मतदार नोंदणी व अचूक मतदार यादी हा मुख्य अजेंडा लक्षात ठेवून प्रशासनाने आतापासून तयारी करावी. नवमतदार नोंदणीकरीता शाळा व महाविद्यालयांमध्ये अतिशय नियोजन पध्दतीने विशेष मोहीम राबवून जनजागृती करावी. यासाठी संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यांसोबत सतत संपर्कात रहावे. नवमतदारांची ऑनलाईन नोंदणी सोबतच ऑफलाईन नोंदणीसुध्दा करण्यात यावी. संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या शंभर टक्के अचूक होणे अपेक्षित आहे. यात मयत तसेच स्थलांतरीत नागरिकांची नावे वगळणे, नाव, पत्ता व इतर काही दुरुस्ती असल्यास करून घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

          निवडणूक विभागाने महिला, दिव्यांग व तृतीयपंथी मतदारांना विशेष प्राधान्य दिले आहे. दिव्यांग मतदारांची शंभर टक्के नोंदणी होणे आवश्यक आहे. जे दिव्यांग मतदार जागेवरून हालचाल करू शकत नाही, अशा मतदारांना पोस्टल बॅलेट देण्याचे नियोजन आहे. ४० टक्क्यांच्या वर दिव्यांग असलेल्या व्यक्तिच्या प्रमाणपत्राकरीता जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. याबाबत वरील अधिका-यांची बैठक घेण्यात यावी असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

         ८० वर्षावरील मतदारांची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी. यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगर पालिका स्तरावरील याद्या प्राप्त करून घ्याव्यात. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची त्वरीत पडताळणी करावी. मतदान केंद्र असलेल्या शासकीय शाळा व इतर इमारतींची दुरुस्ती असल्यास त्याबाबतचे नियोजन आतापासूनच करावे. फॉर्म नं 6, 7 आणि 8 मधील नागरिकांचे दावे व हरकती प्रलंबित ठेवू नये. मतदान यंत्रे (ईव्हीएम, व्हीव्हीपॅट) ठेवण्यासाठी गोडाऊन व्यवस्थापन व्यवस्थित करून घ्यावे, अशा सुचना मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिल्या.

       जिल्ह्यात  मतदार निवडणूक ओळखपत्र आधार कार्डाशी जोडण्याचे काम उत्तम झाल्याचे सांगून श्री. देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी निवडणूक यंत्रणेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी व डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या समस्या जाणून घेतल्या.