भूयारी गटार व डम्पिंग यार्डचा प्रश्न आ.अग्रवालांनी मांडला विधानसभेत

0
14

गोंदिया,दि.18-महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी शहरात सुरू असलेल्या भूयारी गटार योजनेच्या कामातील निष्क्रीयता,गैरप्रकार,सुरक्षेचा अभाव,डम्पिंग यार्डासह पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.गोंदिया नगरपालिकेच्या स्थापनेला 100 पेक्षा अधिक वर्षे झाले.मात्र कचरा व्यवस्थापन केंद्राची सुविधा झाली नाही.शहरातील कचरा शहराबाहेर कुठेतरी मोकळ्या जागेवार टाकला जातो.कालांतराने त्याला आग लावली जाते.यामुळे प्राण,वित्तहाणीचा धोका तर भेडसावतोच मात्र प्रदुषणही होते.या समस्येतून
मार्ग काढण्यासाठी शहराजवळील एका गावात डम्पिंग यार्ड उभारण्याची योजना आखण्यात आली होती,मात्र तेथील नागरिकांच्या विरोधामुळे ते काम यशस्वी होऊ शकले नाही.आता शहराच्या एमआयडीसी परिसरात यासाठी उपाययोजनेची मागणी अग्रवालांनी सभागृहाला केली. शहराचे वसाहतीकरण झाले आहे.लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.अनेक भागात पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या आहे.यासाठी सादर करण्यात आलेल्या 208 कोटींचा आराखडा मंजूर करावा,धापेवाडा प्रकल्पातू पाण्याची व्यवस्था करावी,अशी मागणीही त्यांनी केली.शहरात भूमिगत गटर योजनेचे काम सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.नुकतेच शहरातील मामा चौकात योजनेचे काम सुरू असताना कामावरील मजूराचा सुरक्षेच्या अभावात मृत्यू झाला.यापुर्वी निकृष्ठ कामासंदर्भात नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या,कारवाई झाली नाही.ठेकेदारावर कारवाई व्हावी,मृतकाच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी अग्रवाल यांनी सभागृहात केली. मंत्री उदय सामंत यांनी वरील सर्व मागण्यांवर लवकरच बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.