शास्त्री वॉर्डात आठवडाभरापासून दुषित पाणीपुरवठा

0
12

मजिप्राचे दुर्लक्ष : पाईपलाईन फुटल्याची चर्चा
गोंदिया : शहरातील प्रभाग क्र.२०/२१ अंतर्गत येणार्‍या शास्त्री वॉर्ड येथे मागील आठवडाभरापासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी शुध्द पाण्याच्या शोधार्थ नागरिकांची वणवण सुरू आहे. पाईप लाईनचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा खंडीत झाला असावा, असा अंदाज होता. परंतु, या प्रकाराला ८ दिवस लोटूनही पाणी पुरवठ्यात सुधार झालेला नाही. याकडे मजिप्राचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
शहरात पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. शहरातील नागरिकांना सकाळ व सायंकाळी अशा प्रकारे दोन वेळा नळांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, शास्त्री वॉर्ड येथे मागील आठ दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा सुरू आहे. पाणी एवढे दुषित असल्याने वापरण्यायोग्यही नाही. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांची वणवण सुरू आहे. दुषित पाणी पुरवठा होत असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाईप लाईनचे काम सुरू असल्याने एखाद्या ठिकाणाहून गळती लागली असेल, यामुळे नळांना दुषित पाणी येत असावे, असा अंदाज नागरिक व्यक्त करीत होते. पण या बाबीला ८ ते १० दिवस लोटूनही शुध्द पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने लक्ष केंद्रीत शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शास्त्री वॉर्ड व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
पाणी पुरवठा खंडीत…
शास्त्री वॉर्डासह परिसरात दुषित पाणी पुरवठा होत आहे. ही समस्या कायम असताना पाणी पुरवठा योजनेतंर्गत होत असलेल्या पाणी पुरवठ्यात खंड पडला आहे. सकाळी एक ते दिड तास नळांना पाणी येत आहे. तर सायंकाळी पाणी पुरवठाच बंद राहत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील अनेक भागात नळांच्या माध्यमातून दिवसभर पाणी पुरवठा होत असे. परंतु, मागील ८ दिवसांपासून यामध्ये विघ्न आले आहे.
..बोरवेलही नांदुरूस्त
परिसरात नळांना दिवसभर पाणी येत असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या सुटली होती. पण मागील ८ दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळांना येणारे पाणी वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरिक बोरवेलकडे वळले. पण बोरवेलही बंद पडून असल्याने नागरिकांच्या समस्येत अधिकच भर पडली आहे.