जिल्हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी पर्वणी विविध प्रकारचे स्टॉल

0
35

आधुनिक तंत्रज्ञान
चविष्ट पदार्थांची मेजवानी

         गोंदिया, दि.23 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सवात शेती विषयक नाविन्यपूर्ण शेती औजारे, प्रयोगशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्पादन, महिला बचत गटांची उत्पादने व खाद्य पदार्थ यांची रेलचेल बघायला मिळत आहे. २३ ते २७ मार्च दरम्यान मोदी मैदान, टी पॉईंट जवळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

         शेतकऱ्यांसाठी हा महोत्सव पर्वणी असून जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग या ठिकाणी पहायला मिळणार आहेत. एकूण शेती व शेती तंत्रज्ञान जवळून पाहण्याचा योग्य या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना येणार आहे. धानाच्या विविध जाती, कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आधुनिक यंत्र शेती याबाबत या महोत्सवात माहिती देण्यात येते आहे.

         कृषी महोत्सवात विविध प्रकारचे एकूण १५० स्टॉल लावण्यात आले आहेत. एकात्मिक शेती प्रणाली, पौष्टिक तृणधान्य, हरितगृह, पॉली हाऊस, सामूहिक शेततळे, शेंद्रिय शेती, काळा तांदूळ, मका शेती, शेती उपयोगी औजारे, शेंद्रिय भाजीपाला, स्ट्राबेरी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गट उत्पादित उत्पादने, महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती, मत्स्यव्यवसाय, विधी सेवा प्राधिकरण, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बियाणे, यंत्र, बचतगटाने तयार केलेले खाद्य पदार्थ, आरोग्य, चाईल्ड लाईन आदी स्टॉलचा यात समावेश आहे.

        या महोत्सवात पाचही दिवस शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. २४ मार्च रोजी पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा, २५ मार्चला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेते संमेलन, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कार्यशाळा, २६ मार्च रोजी विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्र आणि २७ मार्च रोजी कृषी महोत्सव समारोपीय कार्यक्रम तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.