कृषी महोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांचा नेत्रदानाचा संकल्प अर्ज भरून केली सुरुवात

0
22

गोंदिया, दि.23 : सर्व श्रेष्ठ दान हे रक्तदान व नेत्रदान असे आपण नेहमीच म्हणतो. रक्तदान आपल्यापैकी बरेच नागरिक प्रसंगी करत असतात. मात्र नेत्रदानाचा संकल्प खूप कमी लोक करतात. कृषी महोत्सवात आज  जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी अर्ज भरून नेत्रदानाचा संकल्प केला.

        केटीएस सामान्य रुग्णालयाच्या वतीने कृषी महोत्सवात नेत्रदान जनजागृती स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवरील डॉक्टर नागरिकांना नेत्रदानाचे महत्व समजावून सांगत होते. आपल्या मरणोप्रांत नेत्रदानामुळे आपण नसलो तरी इतरांच्या माध्यमातून जग पाहू शकतो. “जिते जिते रक्तदान, जाते जाते नेत्रदान, और जाने के बाद नेत्रदान-देहदान” हा मूलमंत्र डॉक्टर लोकांना सांगत होते. या स्टॉलला जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानाचा अर्ज भरून आपला नेत्रदानाचा संकल्प केला. हा संकल्प इतरांसाठी आदर्श असाच आहे. रक्तदान करा, नेत्रदान करा, देहदान करा हा सल्ला इतरांना देतांना त्याची सुरुवात आपल्यापासून करण्याला खूप महत्व असते. जिल्हाधिकाऱ्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले.

         एक वर्ष वयापासून कुठलीही व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करू शकते. अन्नातून विषबाधा झालेली व्यक्ती, गंभीर आजार असलेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. नेत्रदानाची प्रक्रिया सुलभ असून नेत्र काढण्याची प्रक्रिया केवळ पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण केली जाते. चष्मा असलेली व्यक्ती, मधुमेह झालेली व्यक्ती किंवा मानसिक आजार असलेली व्यक्ती नेत्रदान करू शकते. ज्यांना मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा असेल त्यांनी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कक्ष केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.