जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
12

 गोंदिया, दि.24 : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन 24 मार्च रोजी मोदी मैदान, गोंदिया येथे करण्यात आले होते. दैनंदिन मानवी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य जसे- ज्वारी, बाजरी, नाचणी, कुटकी, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा समावेश व्हावा तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून सदर पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

        स्पर्धेमध्ये विविध बचत गटांच्या महिलांनी तसेच इतरही महिला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये महिलांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, कुटकी, राजगिरा इत्यादी तृणधान्यांपासून तयार होणारे विविध पदार्थ जसे- ज्वारीचे लाडू, बाजरीची खीर, बाजरीच्या भाकरी, चकली, थालीपीठ, चीला, वडे, इडली, पराठे इत्यादी पदार्थ तयार करून स्पर्धेमध्ये ठेवले होते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये व तृतीय बक्षीस दोन हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे ठेवण्यात आलेली होती.

       स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ. ईश्वरी खटवानी, एस.एस.गर्ल्स कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. प्राजक्ता डोंगरवार, आहारतज्ञ सहयोग रुग्णालय गोंदिया या लाभल्या होत्या. परीक्षकांनी सर्व स्टॉल्सना भेटी देऊन महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची चव घेऊन स्पर्धेचे परीक्षण करून निकाल जाहीर केले. यामध्ये  श्रीमती मीनाक्षी बागडे कारंजा तालुका गोंदिया यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, मातोश्री महिला बचत गट छोटा गोंदिया यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला तर श्रीमती नेहा राजेंद्र दीक्षित गोंदिया यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

        विजेत्यांना परीक्षक म्हणून लाभलेल्या डॉ. प्राजक्ता डोंगरवार, डॉ. ईश्वरी खटवानी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांच्या हस्ते बक्षीसे व प्रशस्तीपत्र  प्रदान करण्यात आले. तसेच  स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी गोंदिया पवन मेश्राम, मंडळ कृषी अधिकारी अर्जुनी/मोर कुमुदिनी बोरकर, मंडळ कृषी अधिकारी सालेकसा नंदू वानखेडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड आदी मान्यवर उपस्थित होते.