क्षयरोग निर्मुलनासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्वाची – जिल्हाधिकारी

0
8

गोंदिया, दि.28 : प्रत्येक खाजगी दवाखान्यात औषधी घेणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला देणे बंधनकारक असून जिल्ह्यातील क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाकरीता खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्वाची आहे, असे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.

        24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून खाजगी वैद्यकीय व्यावसायीक निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते.

        प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद ही निक्षय पोर्टलवर करण्यात यावी तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व सोयी-सुविधांची जसे- थुंकी तपासणी, क्ष-किरण तपासणी, सोनोग्राफी, रक्त तपासणी, ब्रोन्कोस्कोपी, सीटी स्कॅन, एमआरआय इत्यादी सुविधा खाजगी वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

        सीएमईमध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे महत्व सांगून सन 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करावयाचे उद्दिष्ट प्रधानमंत्री यांनी दिलेले आहे. क्षयरोग हा नोटीफियेबल डिसीज आहे. निक्षय पोर्टलमध्ये क्षयरुग्णांची नोंद अद्ययावत करणे व इतर निर्देशांक अद्ययावत करणे याबद्दलची माहिती प्रास्ताविकातून डॉ.नितीन कापसे यांनी दिली.

         यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे छातीरोग विशेषतज्ञ डॉ.पंकज घोलप, जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व गोंदिया जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसीएशनचे अध्यक्ष डॉ.विकास जैन, डॉ.गौरव अग्रवाल सचिव आयएमए गोंदिया व सर्व आयएमए सभासद व खाजगी वैद्यकीय व्यावसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.