लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

0
6

अमरावती, दि. १ : लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.

शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सभागृह क्र. 2 येथे झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शेगाव येथील प्रॉपर्टी चेंबर कनेक्शनचे प्राधान्याने काम पूर्ण करावे.नो पार्किंग झोनमध्ये शिस्तपालनासाठी ठळक फलक लावावेत व आवश्यक तिथे दंडात्मक कार्यवाही व्हावी. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. सर्व यंत्रणांनी आर्थिक व भौतिक कामांचा मासिक प्रगती अहवाल दरमहा सादर करावा. दोनमोरी ते रेल्वेगेट रस्त्यासह शहरातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी. नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. यंत्रणांनी कामांची परिपूर्ण माहिती वेळोवेळी सादर करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले.

लोणार सरोवर विकास आराखड्यात अंतर्भूत असणारी हिंदु स्मशानभूमी, बौध्द समाज स्मशानभूमी, मुस्लीम कब्रस्थान, वाणी समाज स्मशानभूमीची कामे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प दुरुस्ती व भूमीगत गटार योजनांची कामे 30 जूनपुर्वी पूर्ण करावी. सरोवर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावी. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील अन्नछत्र स्थळाजवळील अतिक्रमण धारकांचे पुनवर्सनासाठी प्रभावी नियोजन करण्यात यावे. मलनि:सारण केंद्र (एसटीपी) ते संतोषी माता मंदिरपर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, लोणार सरोवरानजीक वेडी बाभळीची झाड-झुडपे काढून टाकावीत. तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश डॉ. पाण्डेय यांनी दिलेत.

शेगाव विकास आराखड्यात ४२९ कोटी ५६ लाख रू. निधीतून विविध कामांना चालना मिळाली. त्याचप्रमाणे, लोणार विकास आराखड्यात ३६९ कोटी ७८ लाख रू. निधीतून कामांना चालना देण्यात आली आहे, अशी माहिती आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी यांनी दिली.