लोकसेवा हक्क कायदयाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी षण्मुगराजन सन्मानित

0
5

वाशिम, दि. 19 : जिल्हयातील नागरीकांना पारदर्शक पध्दतीने कार्यक्षम व योग्यवेळी लोकसेवा तत्परतेने ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांना  18 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

       कोतवाल बुकाची नक्कल हा एक महत्वाचा जुना दस्ताऐवज स्कॅनिंग करुन ई-कोतवाल बुक प्रणाली विकसीत करुन सन 2022-23 या वर्षात श्री. षण्मुगराजन एस. यांनी जिल्हयात कार्यान्वीत केली. तसेच जिल्हयातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयामध्ये अशा एकूण 14 ठिकाणी एटीडीएम मशिन स्थापित केल्या. या मशिनच्या माध्यमातून नागरीकांना सातबारा, गाव नमुना 8-अ, फेरफार व हक्क नोंदणी नक्कल इत्यादी दस्ताऐवज तत्परतेने ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याबद्दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन एस. यांनी केली आहे. या उपक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सुध्दा श्री. रामबाबू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

       श्री. रामबाबू यावेळी म्हणाले, लोकांना चांगल्या व तत्परतेने आणि पारदर्शकपणे सेवा मिळाल्या पाहिजे. जे महत्वाचे उपयुक्त असलेले दस्ताऐवज आहे जसे की, कोतवाल बुक नक्कल जी वारंवार हाताळल्याने खराब होते. मात्र या कोतवाल बुकचे स्कॅनिंग करुन त्याला ई-कोतवाल बुक प्रणालीत विकसीत करुन लोकांच्या सेवेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. षण्मुगराजन हे कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. विविध विभागाच्या सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्याची जबाबदरी यंत्रणांची आहे. या अधिनियमांतर्गत वाशिम जिल्हयाने चांगले काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले, या अधिनियमांतर्गत प्रगती करायला बराच वाव आहे. स्कॅनिंग केलेला डेटा पोर्टलवर अपलोड केला तर नागरीकांना आणखी चांगल्या सूविधा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा पोर्टलच्या माध्यमातून नागरीकांना उपलब्ध होतील. असे त्यांनी सांगितले.

        यावेळी उपसचिव अनिल खंडारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक अभिनव बालुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.