1 ते 30 एप्रिल हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा

0
15

गोंदिया,दि.19 : हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीकरीता त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी 25 एप्रिल हा ‘जागतिक हिवताप’ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतू 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन एवढा एकच दिवस जनजागृती करुन न थांबता संपूर्ण महिना 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 हा हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्याबाबत शासन स्तरावरुन निर्देशित करण्यात आले आहे.

          पावसाळ्यात किटकजन्य आजाराचा उदा. हिवताप, डेंग्यू, जेई, चिकुनगुनिया, हत्तीरोग इत्यादी आजाराचा डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाल्यामुळे या रोगाचा प्रसार होत असतो. बरेचदा यामध्ये मृत्यू सुध्दा होत असतात. सदर जनजागरण मोहिमेमधून हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. किटकजन्य आजार नियंत्रणाच्या विविध उपायामुळे या आजाराच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी व समाजातील जंतुभार कमी करण्यासाठी रुग्णांनी संपूर्ण उपचार घेणे तसेच घर व परिसरात डासोत्पत्ती स्थानाची निर्मिती होऊ न देणे आवश्यक आहे.

         आरोग्याबाबतची कोणतीही योजना जनतेच्या सक्रीय सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. रुग्ण शोध मोहिम तसेच डासावर नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग महत्वपूर्ण आहे. म्हणून जनतेनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने किटकजन्य कार्यक्रमास सहकार्य केल्यास डासापासून प्रसार होणाऱ्या आजारावर नियंत्रण होऊन सर्व जनतेला चांगल्या आरोग्याचा लाभ होऊ शकतो.

         जनजागृती ही फक्त शासनाची जबाबदारी नसून जनतेने सुध्दा या कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे. किटकजन्य आजार प्रतिरोध मोहिम ही तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र व गाव पातळीवर राबविण्यात येऊन मोहिमेत सदर ठिकाणी ग्रामसभा घेऊन जनतेला किटकजन्य आजाराचा प्रसार कशापासून होतो, आजाराची लक्षणे, नागरिकांनी घ्यावयाची काळजी, उपचाराची उपलब्धता इत्यादी बाबींवर जनजागृती करण्यात येणार आहे व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे.

         या मोहिमेमध्ये विविध विभागाचा सहभाग घेण्यात येणार असून खाजगी वैद्यकीय व्यवसाईक, स्वयंसेवी संस्था इत्यादींचा सहभाग मिळणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. ताप आल्यास रुगणांनी रक्ताची तपासणी अवश्य करावी. हिवताप झाल्याचे निदान झाल्यावर रुग्णास हिवतापाचा संपूर्ण उपचार आवश्यक आहे. स्वच्छ परिसर ठेवल्यास डासांची भरमसाठ वाढ होत नाही. झोपतेवेळी मच्छरदाणीचा वापर अवश्य करावा. फवारणीमध्ये आपले संपूर्ण घर फवारणीसाठी फवारले जाईल यासाठी फवारणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या बेशुध्दावस्था अशी लक्षणे ही हिवतापाची धोकादायक लक्षणे असतात, अशावेळी रुग्णास तात्काळ शासकीय दवाखान्यात दाखल करावे. असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी कळविले आहे.