गोंदिया, दि.25 : जागतिक हिवताप दिनानिमीत्त जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया यांचे वतीने 25 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे तसेच अवैद्यकीय अधिकारी दिलीप कुमरे यांनी हिवतापाविषयी प्रतिज्ञा घेऊन रॅलीला सुरुवात केली.
यावेळी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी विद्यार्थी तसेच उपस्थित लोकांना 25 एप्रिल जागतिक हिवताप दिनाचे महत्व समजावून सांगून आवाहन केले की, ही वेळ शुन्य मलेरियाला वितरीत करण्याची आहे. त्याकरीता सर्वांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन स्वत: पासून सुरुवात करावी. जसे की, झोपतांनी मच्छरदानीचा नियमीतपणे वापर करावा असे सांगितले.
डॉ.नितीन वानखेडे यांनी सांगितले की, नाल्या गटारे वाहती करावी, साचलेल्या पाण्यात जळालेले इंजीन ऑईल टाकून डासांचा नायनाट करावा.
डॉ.अमरीश मोहबे म्हणाले, आपण स्वत: आपल्या आरोग्याची काळजी घेऊन डेंग्यू मलेरिया सारख्या गंभीर व जीवघेण्या आजारापासून सावध राहावे. ताप आल्यास नजिकच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन रक्ताची तपासणी करावे. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो, म्हणून तात्काळ रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी संपर्क करावे.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व शहरी विभागातील आशा सेविका यांनी ‘कोरडा दिवस पाळा – हिवताप टाळा’, ‘माझ्यापासून सुरुवात करु – हिवतापाला शुन्य करु’, ‘येता कणकण तापाची – करा तपासणी रक्ताची’ इत्यादी घोषवाक्य वापरुन जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयातील आशिषकुमार बले, पंकज गजभिये, शितलकुमार दोनोडे, के.एन.डोंगरे, श्री. ठाकुर, श्री. जायभाये, अजय चौधरी, जितु वैसवारे व विजयसिंग बनाफर यांनी मोलाचे परिश्रम घेतले.





