उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत नोंदविला निषेध
गोंदिया,दि.२५- सामुहिक वनहक्क दाव्यांतर्गत ग्रामसभांना तेंदूपान संकलनाचे अधिकार बहाल करण्यात आले असताना देवरी तालुक्यातील ग्रामसभांवर वनविभागाने निर्बंध लादून त्यांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. या प्रकाराचा निषेध आणि विरोध करण्याच्या उद्देशाने संयुक्त ग्रामसभांच्या वतीने आज (दि. २५) हजारो नागरिकांचा मोर्चा काढून देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात वनविभागाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवित मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केले. मोर्च्यात आमदार सहसराम कोरेटे, ग्रामसभा मंडळाचे नारायन सलामे, तेजराम मडावी, सुदाम भोयर, नारायण ताराम, विलास भोगारे, उमेश बागडेहरीया, रमेश ताराम, गणेशराम राउत, गजानन शिवणकर यांनी सहभागी होत निवेदन सादर केले. वनविभागाने ग्रामसभांच्या कार्यक्षेत्रात केलेला शिरकाव तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वनहक्क धारकांस वनहक्क कायदा २००६ मधील प्राप्त अधिकारानुसार वनांवर सामुहिक वनहक्क प्राप्त झाले आहेत. त्यात ग्रामसभेला गौण वनउपज संकलन व विक्रीचे सर्व स्वामीत्व अधिकार दिलेले आहेत. त्याचे पारंपारिक क्षेत्रातून ( कलम ३ (१) (ग) ) प्रमाणे वनहक्क धारक तेंदुपाने व ईतर वनउपज संकलन करण्याचे अधिकार प्राप्त आहेत. असे असताना उपवनसंरक्षक गोंदिया यांनी तेंदुपत्ता संकलन व विक्री करण्याकरिता ग्रामसभांना अडचणी निर्माण केल्याचे ग्रामसभांचे म्हणणे असून वनविभागाच्या या भूमिकेविरोधात मोर्चा काढून आपला रोष सरकारकडे नोंदवला.





