आर्यांचे पंचतत्व हे माणसाला गुलाम बनविण्याचे साधन – इंजि. अरविंद माळी

0
12

गोंदियात बुद्ध जयंती उत्साहात साजरी

गोंदिया दि.७ :- विदेशी आर्यानी बुद्धीबल, धनबल, बाहुबल, मनोबल आणि सांस्कृतिक इतिहासाचे खच्चीकरण करून याचं पंचतत्वाच्या बळावर माणसाला गुलाम बनविले, विदेशी आर्यांचे पंचतत्व माणसाला गुलाम बनविण्याचे साधन आहेत, असा हल्ला सामाजिक प्रबोधनकार इंजि. अरविंद माळी यांनी चढविला. गोंदियात बुद्धजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात (दि.६) श्री माळी बोलत होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सामाजिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भीमनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जयंतीचे अध्यक्ष नानाजी शेंडे हे होते. मंचावर उपायुक्त धनंजय वंजारी, विश्वरत्न डॉ आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष अक्षय वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना इंजि.माळी म्हणाले की, बुद्ध हे कोण्या व्यक्तीचे नांव नाही तर ती उपाधी आहे. तथागत म्हणजे मार्गदाता होय, असे सांगून बुद्ध बोलले तसेच ते चालले असेही ते म्हणाले. बुद्धांसमोर विदेशी आर्य आणि चार्वाक यांच्या दोन संस्कृती उभ्या होत्या. आर्यानी प्रतिपादित केलेले विचार जसे की माणसाला मागच्या जन्मात केलेले पापाचे प्रायश्चित करावे लागते तर चार्वाक संस्कृति सांगायची की व्यक्तीच्या मागच्या जीवन जगण्यावर नाही तर वर्तमान जगण्यावर विचार व्हावा. देवावर विश्वास ठेवणारे आस्तिक आणि विश्वास न ठेवणारे नास्तिक, अशीही विचारधारा बुद्धासमोर होती. या दोन्ही विचारधारेचा अभ्यास बुध्दाने केला. श्री माळी पुढे म्हणाले की अस्तित्वात नसलेल्या गोष्टी मान्य करणे म्हणजे आस्तिक आणि अमान्य करणे म्हणजे नास्तिक असा युक्तिवाद त्यांनी केला. बुद्धाने निसर्ग, ग्रह आणि मानवी मेंदूचाही अभ्यास केला. सूर्य, पृथ्वी यांच्याशी माणूस कसा संलग्न आहे हेही बुद्धाने सांगितले. बुद्ध हा जगाचा पहिला वैज्ञानिक असून जे कळते ते ज्ञान आणि त्याची मांडणी करणे म्हणजे विज्ञान होय, असा बुद्धांचा उपदेश होता.
या प्रसंगी बोलताना उपायुक्त वंजारी यांनीही विचार मांडले, ते म्हणाले की, इतिहास सांगणे आणि अमलात आणणे हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. राजकारणामध्ये धम्माचे कसे महत्व आहे, हे पटवून देऊन मानवकल्याणासाठी धम्माची आवश्यकता आहे, यामुळेच भारत विश्वगुरू बनेल अशी ग्वाही त्यांनी दिली. बुद्धिजम अंगीकारल्या शिवाय राजकारण करणे अपयशी ठरेल, असा युक्तिवादही त्यांनी केला.
याप्रसंगी लोकशाहीर संभाजी भगत यांनी प्रबोधपर संगीत जलसा कार्यक्रम सादर केला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बुद्ध जयंती दिनी शहरात देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. “बुद्ध धम्म की क्या पहचान -मानव मानव एक समान” या उदघोषनेने गोंदिया नगरी दुमदुमली.
कार्यक्रमाचे संचालन ऍड. एकता गणवीर आणि डॉ. राजेश उके यांनी केले. सहयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास वासनिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भीमसैनिकांनी अथक परिश्रम केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.