सघन बैठकीतून ग्रामस्थांना केले जागृत, दारूविक्रेत्यांना नोटीस

0
9
गडचिरोली : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून 20 किमी अंतरावर येत असलेले नारायणपूर हे गाव मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत येतो. या गावात मुक्तीपथ तर्फे सघन बैठकीचे आयोजन करून अवैध दारूविक्री विरोधात आवाज उठवण्यासाठी ग्रामस्थांना जागृत करण्यात आले. सोबतच विक्रेत्यांना नोटीस देऊन दारूविक्री तत्काळ बंद करण्याची तंबी देण्यात आली.
 सदर गाव पूर्वीपासूनच अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध होते. दरम्यान, मुक्तीपथ तर्फे गावात अनेकदा सभेचे आयोजन करून लोकांना दारुचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले व गाव संघटनेत सक्रिय लोकांना जोडण्यात आले. अशातच गावात सघन बैठकीचे आयोजन करून ग्रामस्थांना पेसा कायद्याची माहिती दिली. या कायद्या अंतर्गत दारुबंदी समिती गावात असणे आवश्यक आहे. गावात दारू विक्री होत असेल तर पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. शिवाय पेसा अंतर्गत गावाला मिळालेल्या साधन संपत्तीचे मालकी हक्क, दारूमुळे गावात होणारे दुष्परिणाम यासंदर्भात ग्रामस्थांना मुक्तीपथ उपसंघटक आनंद सिडाम यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदीचा निर्णय घेतला. त्यांनतर गावातील विक्रेत्यांना नोटिस बजावून अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी स्पार्क कार्यकर्ती प्रियंका भूरले उपस्थित होत्या.