समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत  कार्यवाही कधी?

0
17
जि.प. अध्यक्षांनी दिलल्या पत्रावर देखील कार्यवाही नाही…
बदली करू नये म्हणून स्थानिक कर्मचाऱ्यांची आमदारासह जि.प. पदाधिकाऱ्यांना साकडे….
गोंदिया : जिल्हा परिषद सर्व/समग्र शिक्षा अभियानात तालुकास्तरावर व डायट अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याही प्रशासकीय बदल्या सन 2019 ला आलेल्या मार्गदर्शन पत्रानुसार माहे एप्रिल व मे महिन्यात करण्यात यावे असे निवेदन अवघड क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना देऊन बदलीची मागणी केली होती. या निवेदनावर जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु आजपावेतो 18 दिवसांचा कालावधी लोटून देखील शिक्षण विभागाने या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय वा विनंती बदलीबाबत कसलीही कार्यवाही केली नसून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पत्राला केराच्या टोपलीत तर टाकले नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी देवरी, सालेकासा, आमगाव, अर्जुनी मोर, सडक अर्जुनी या तालुक्यात कार्यरत कर्मचारी जिल्हा परिषदेला बदली बाबत निवेदने देतात परंतु  सर्व साधारण क्षेत्रात व स्थानिक तालुक्यात कार्यरत कर्मचारी स्थानिक राजकीय नेते मंडळींकडे जाऊन जिल्हा परिषदेवर बदल्या न करण्याबाबत दबाव आणतात त्यामुळे मागील चार वर्षांपासून जिल्हानंतर्गत बदल्या झालेल्या नाहीत.  यावर्षी देखील या सर्वसाधारण तालुक्यात कार्यरत स्थानिक कर्मचारी यांनी बदल्या न करण्याबाबत निवेदने देऊन जिल्हा परिषदेवर राजकीय दबाव आणला असल्याचे सांगितले जात आहे. बदल्या व्हायला नकोत म्हणणारे कर्मचारी जास्त आहेत. बदल्या मागणारे कर्मचारी फार कमी आहेत त्यामुळे ज्यांचे विनंती बदलीकरिता अर्ज आलेत त्यांच्याच बदल्या करण्यात यावे असेही बोलले जात आहे. विनंती नुसार ज्यांनी जो तालुका मागितला तिथे त्यांच्या बदल्या करून त्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना खो द्यावा अशीही मागणी होत आहे.
“मागील 10 ते 15 वर्षांपासून आम्ही देवरी, सालेकसा, अर्जुनी मोर, आमगाव या अवघड तालुक्यात कार्यरत आहोत. आम्हाला सर्वसाधारण क्षेत्रात गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात येण्याचा अधिकार नाही का? आम्ही दरवर्षी बदलीची मागणी करतो पण आमची बदली होत नाही. यावर्षी काहीही झाले तरी बदली करून घेऊच त्यासाठी शेवटी आम्हाला उपोषणाला बसावे लागले तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही”…
– बदली मागणारे कर्मचारी, समग्र शिक्षा जिल्हा परिषद गोंदिया