बदलीत पात्र उमेदवार ऐनवेळी अपात्र

0
31

मुख्यालयातील कर्मचारी देवरीला रूजू न होताही बदलीस ठरविले पात्र

गोंदिया,-. जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदलीकरिता (ता. 11) कार्यशाळा घेण्यात येणार आहे. 21 एप्रिल रोजी बदलीस पात्र ठरविण्यात आलेल्या सहाय्यक लेखा अधिकारी हेमलता तरोणे यांना पात्र ठरविण्यात आले होते. तर 4 मे रोजीच्या यादीत त्यांना अपात्र ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, सहाय्यक लेखा अधिकारी ए. आर. चर्जे यांचे 2022 ला देवरी येथे स्थानांतर होऊनदेखील ते रुजू व कार्यमुक्त न होताच त्यांना आता पात्र ठरविण्यात आल्यामुळे बदली प्रक्रियेवरच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे गेल्यावर्षी झालेल्या सांखिकी विस्तार अधिकारी पदाच्या बदलीतही गोंधळ झालेला होता,यावर्षीही नवीन युक्त्या लावण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
2023 च्या जिल्हा परिषद सार्वजनिक बदलीची प्रक्रिया सुरू आहे. लेखा व वित्त विभागातील बदलीसंदर्भात उद्या, गुरुवारी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. लेखा व वित्त विभागाने 21 एप्रिल रोजी बदलीपात्र सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात पहिल्या क्रमांकावर ए. आऱ्. चर्जे यांचे नाव होते. त्यांची बदली 2022 मध्ये गोंदिया मुख्यालयातून देवरीला झाली होती. मात्र ते बदलीच्या ठिकाणी अद्यापही रुजू झाले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर, तर दुसऱ्या क्रमांकावर बदलीस पात्र म्हणून हेमलता तरोणे यांचे नाव होते. त्यानंतर 4 मे रोजी पुन्हा दुसरी बदलीपात्र यादी प्रसिद्ध कऱण्यात आली. त्यात पहिल्या क्रमांकावर ए. आर. चर्जे यांचेच नाव असून त्यापुढे पं.स. देवरी येथे बदली झाली आहे, असा उल्लेख आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हेमलता तरोणे यांचे नाव असून बदलीस अपात्र असा शेरा मारण्यात आला आहे. एकाच विभागाच्या पत्रांत असा घोळ झाल्यामुळे आणि ए. आर. चर्जे 2022 मध्ये बदली होवूनही बदलीच्या ठिकाणी रुजू आणि कार्यमुक्त झाले नसताना देखील सलग दुसऱ्या वर्षी बदलीस पात्र कसे ठरत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. या यादीमुळे लेखा व वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बदलीत मोठा घोळ होत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.