मुख्याधिकारी श्रीमती मिन्नु यांची बदली करु नका

0
12

लोकप्रतिनिधींसह नागरीकांची मागणी

वाशिम, दि. 12  : वाशिम शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्याचा ध्यास घेणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) परिवीक्षाधिन अधिकारी तथा वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम. यांना आणखी काही महिने वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी ठेवण्यात यावे. त्यांची बदली करु नये. अशी मागणी लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन तसेच काहींनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून केली आहे. काहींनी तर मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मुख्याधिकारी श्रीमती मिन्नु यांना आणखी काही महिने वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी ठेवण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.

          श्रीमती मिन्नु यांनी आपल्या परिविक्षा काळात वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे हाती घेताच वाशिम शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प केला. केवळ त्यांनी संकल्पच केला नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत देखील आणला. शहरातील रस्त्यावरील व चौका-चौकातील अतिक्रमणामुळे शहराचे बकाल रुप बघायला मिळत होते. अतिक्रमणामुळे वाहतुकीला व रहदारीला मोठया प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. अनेकांनी तर रस्त्यावरच पक्के बांधकाम देखील केले होते. अकोला नाका, बसस्थानक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद नाका, पाटणी चौक, फुले भाजी मार्केट, अकोला नाका ते काटा रोड यासह अन्य भागातील रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण श्रीमती मिन्नु यांनी जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने भुईसपाट केले. अतिक्रमणमुक्त झालेले रस्ते आणि चौकामुळे शहरातील हे रस्ते व चौक आता प्रशस्त दिसत आहेत.

         अतिक्रमण मोहिम सुरु होणार असल्याची माहिती अतिक्रमण धारकांना होताच अनेक जणांनी केलेले अतिक्रमण स्वत:च काढून घेतले. शहरातील अतिक्रमण हटविल्यामुळे वाशिम शहराने मोकळा श्वास टाकला आहे. अतिक्रमणामुळे मोठया प्रमाणात जागोजागी कचऱ्याचे ढिग व दुर्गंधी पसरली होती. रस्ते अरुंद झाले होते. रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढले होते. अतिक्रमण हटविल्यामुळे रस्ते व चौक आता विस्तीर्ण, मोकळे आणि स्वच्छ दिसू लागले आहे. यापुढेही कोणी अतिक्रमण करणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.