पालकमंत्र्यांनी केली जलसंधारणाच्या मॉडेलची पाहणी

0
9
????????????????????????????????????

 वाशिम, दि. 12  : पालकमंत्री संजय राठोड हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला आले असता त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर ठेवण्यात आलेल्या जलसंधारण मॉडेलची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती वैभव सरनाईक व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार उपस्थित होते.

          जलसंधारणाचे हे मॉडेल पानी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देण्यात आले आहे.             येथे जलसंधारणाचे दोन मॉडेल ठेवण्यात आले आहे. पहिल्या मॉडेलमध्ये उपचारापूर्वीचे दुष्काळी गाव दाखविण्यात आले आहे. दुसऱ्या मॉडेलमध्ये उपचारानंतरचे जलसंपन्न गाव कसे तयार झाले हे दाखविण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये माथा ते पायथा झालेले उपचार, समतल चर, डिप सीसीटी, दगडी बांध, गॅबियन बंधारा, कपार्टमेंट बेडींग, नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, सिमेंट बंधारे, शेततळे व पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहीरी या उपचारातून दिसून येते. यामधून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाण्याने भरलेले शेततळे, विहीरीची वाढलेली पाण्याची पातळी यातून पाण्याच्या उपलब्धतेमुळे बहरलेली शेती व गाव हे एका मॉडेलमध्ये दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये उजाड व दुष्काळी गाव दाखविण्यात आले आहे.

           या मॉडेलपासून जलसमृध्द गावाची प्रेरणा जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांनी व शेतकऱ्यांनी घ्यावी व जलसंधारणाच्या कामात आपले योगदान दयावे. असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांना मॉडेल बघतांना केले. मॉडेलबाबतची माहिती जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी पालकमंत्र्यांना दिली.