वनविभागाने कापली दल्लीच्या जंगलातून 54 सागाची झाडे,होतेय चौकशीची मागणी

0
38

ग्रामस्थ करतायेत चौकशीची मागणी,आरएफओवर ग्रामस्थांचा रोष

गोंदिया,दि.18ः- स्वत:च्या शेतातील धुऱ्यावरचे सागाचे एक झाड तोडायचे असले तरी शेतकऱ्यांना वनविभागाचे उंबरठे झिजवावे लागतात.मात्र आपल्या हातून झालेली चूक लपवण्यासाठी जेव्हा खुद्द वन विभागच कामाला लागते तेव्हा कोण कुणाला काय म्हणणार असा प्रकार जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रधिकारी कार्यालयातंर्गत येत असलेल्या रेंगेपार दल्ली येथील जंगलपरिसरात घडले आहे.चांगल्या व सुस्थितीत असलेल्या सुमारे 54 सागाची झाडे जानेवारी ते फेबुवारी महिन्यात कापण्यात आली असून या झाडापासून कुठलाही धोका नव्हता असे ग्रामस्थ सांगत आहेत.2020 मध्ये जी झाडे वादळी वार्यामुळे कोलमडली होती,ती आधीच वनविभागाने नेलेली होती,मात्र आता जी झाडे आत्ता कापली ती एकदम चांगली होती असेही ग्रामस्थांचे म्हणने आहे.

प्रत्यक्ष त्या जंगलातील कापलेल्या झांडाची पाहणी केल्यावरही त्या साग झाड्याच्या बुंध्यापासून लक्षात येते की सदर झाड किती चांगले राहिले असेल परंतु वनविभागाचे अधिकारी वादळ वार्यामुळे झाडे पडण्याचा धोका होता,तर काही झाडे वाळायला लागली होती असे विविध कारणे आणि दर 20 वर्षांनी झाडे कापावी लागतात असे कारण पुढे करुन 54 साग झाडे कापल्याचे प्रकरणाला शासकीय लवाजमा घालण्यात यशस्वी झाल्याचे दिसून आले.मात्र ग्रामस्थ आणि काही नागरिकांच्या मते ही कापलेली झाडे अवैधरित्या कापली गेल्याचे म्हणने आहे.

यासंदर्भात सडक अर्जुनी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव यांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन विचारणा केल्यावर माझ्याकडे वेळ नाही,मी वेगळ्या कामात आहे माहीत देऊ शकत नाही असे सांगत सदर प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ केली.तर दुसरीकडे गोंदिया उपवनसरंक्षक कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षकांना याबाबत विचारणा केल्यावर आपण सदर जागेची पाहणी केल्याशिवाय काहीही सांगू शकणार नसल्याचे बेरार टाईम्सला सांगितले.

विशेष म्हणजे सदर झाडांना फेबुवारी महिन्यात कापण्यात आल्याचे समोर आले आहे.याप्रकरणाचा तपास मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाचे फिरते पथक करीत असल्याची माहितीही आहे.कुणी स्वत:हून झाड तोडलेच तर वन अधिनियमानुसार तो गुन्हा ठरतो.त्यातच सर्वोच्च न्यायालय आणि वनविभागाच्या कायद्यानुसार आता जंगलातील झाडे तोडण्यावर बंदी आहे.ती झाडे त्याचठिकाणी पडून कुजतील परंतु त्यांना कापायचे नाही,आणि उचलायचे नाही असे असतांना व नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या क्षेत्रात हा भाग येत असल्याने झाड कापण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे अनेकांचे मत आहे.मात्र वनविभाग याबाबीला बाजूला टाकत रेंगेपार दल्ली,बाम्हणी येथील साग झाडे उपवनसंरक्षकांच्या परवानगीने कापण्यात आल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे.याप्रकरणात वनमंत्री व मुख्य वनसरंक्षकांनी विशेष तपासणी पथक गठित करुन चौकशी करणे गरजेचे असून वनविभागाचे अधिकारी माहिती देण्यास करीत असलेली टाळाटाळ ही शंकेला वाव ठरणारी आहे.