हल्लेखोर बिबट व दोन बछडे पिंजराबंद

0
12
file photo

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सामदा बूज वन बीटमध्ये येणाऱ्या वाघोली बुटी शिवारात शनिवारी बिबट्याने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या भागात पिंजरे लावले असता मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद करण्यात यश आले.

या भागातील ग्रामस्थांचा रोष बघता वनविभागाने हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्म हाऊस जवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले असता, रविवारी रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद झाले. वाघोली बुटी परिसरात वाघ व बिबट्याने महिनाभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. २० दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने ममता बोदलकर या महिलेला ठार केले होते. तर शनिवारी वाघोली बुटी येथील प्रेमिला रोहणकर या शेतात काम करणाऱ्या महिलेला याच मादी बिबट्याने हल्ला करून ठार केले.या घटनेनंतर शेतात काम करणारे ५० ते ६० जण धावत आले. त्यांनी बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने बिबट्याने धूम ठोकली. या घटनेनंतर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघोली बुटी येथे जाऊन रोहणकर कुटुंबीयांची भेट घेत बिबट्याला पिंजराबंद करण्याची सूचना वन अधिकाऱ्यांना केली. शनिवारी रात्री वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्महाऊसजवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले होते. रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले.