निमगाव व नवेझरी ग्रामपंचायतीची विभागस्तरीय समितीच्या वतीने तपासणी

0
28

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
* विभागस्तरीय चमुने केली विविध योजनांच्या कामाची पाहणी
* ग्रा. पं. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

गोंदिया-: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतंर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची विभागस्तरीय तपासणी १९ मे रोजी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत निमगाव व तिरोडा पंचायत समिती अंतर्गत नवेझरी येथे पार पडली. विभागस्तरीय चमुने दोन्ही गावात विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांकरीता राबविण्यात येत असलेल्या योजनांची पाहणी केली. यावेळी चमुने ग्राम पंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतंर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी राज्यात होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावात विविध योजनांद्वारे विकास कामे, नागरिकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. वैयक्तिक व सार्वजनिकस्तरीय उपाययोजना उभारून गाव स्वच्छ व सुंदर करण्यावर भर दिला जात आहे. सन 2020-21 व 2021-22 या दोन्ही वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा एकत्र घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर यांचे मार्गदर्शनात आठही पंचायत समितीस्तरावर‍ स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव तर द्वितीय येण्याचा मान तिरोडा तालुक्यातील नवेझरी ग्रामपंचायतीने मिळविला होता. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती विभागीय स्पर्धा साठी पात्र ठरल्या होत्या. जिल्ह्यातील दोन्ही ग्राम पंचायतींची विभागस्तरीय तपासणी १९ मे रोजी पार पडली. विभागस्तरीय चमूमध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून उपायुक्त (आस्था) विवेक इलमे, उपायुक्त (विकास) कमलकिशोर फुटाने, उपविभागीय अभियंता (मजिप्रा) अजय बेले, विस्तार अधिकारी श्री पटले आदींचा समावेश होता.

यावेळी चमुने नवेझरी ग्रा. पं. कार्यालयात नागरिकांशी संवाद साधला. गटविकास अधिकारी ‍ सतीश लिल्हारे, ग्राम मंडळ अध्यक्ष महेंद्र भांडारकर, विस्तार अधिकारी नेताजी धारगावे, शितेश पटले, जिल्हा कक्षाचे भागचंद्र रहांगडाले, अतुल गजभिये, पंचायत समितीचे गट समन्वयक राठोड, समूह समन्वयक सुरेश पटले, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे भेट देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी विलास निमजे, विस्तार अधिकारी राणे, विस्तार अधिकारी मोरेश्वर धोंगडे, विस्तार अधिकारी ब्राह्मणकर, बंडगर, सरपंच बंदेश्वरी राऊत, उपसरपंच संदीप पुस्तोडे, माजी सरपंच विश्वनाथ बाळबुद्धे, ग्रामसेवक संतोष परमार, ग्राम पंचायत पदाधिकारी, बचतगट, विविध समित्यांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नवेझरी येथे सचिव शेंडे व ग्राम मंडळ अध्यक्ष महेंद्र भांडारकर तर निमगाव येथील सचिव संतोष परमार यांच्याकडून तपासणी समितीला ग्राम पंचायत संबंधीत विविध योजना, घरकुल, मनरेगा अंतर्गत उपलब्ध रोजगार ,ओडिएफ प्लस अंतर्गत निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांची माहिती देण्यात आली.

मुख्याध्यापक यांच्याकडून शाळा, विद्यार्थी गुणवत्ता, शाळेतील स्वच्छता सुविधा, पिण्याचे पाणी व्यवस्था, स्कॉलरशीप परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, नवोदय विद्यालयाकरीता निवड झालेले विद्यार्थींबाबत चर्चात्मक माहिती घेण्यात आली. अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधून विद्यार्थी संख्या, स्वच्छता सुविधा, बेबी टायलेट सुविधा, पिण्याचे पाणी, पोषण आहार बाबत माहिती जाणून घेण्यात आली. बचतगट महिलांशी गावस्तरावर महिलांना निर्माण झालेल्या उद्योग, खेळते भांगभांडवलाचा लाभ तसेच नळ पाणी पुरवठा योजना, पाणी शुध्दीकरण, जलसुरक्षक व महिलांच्या सहायाने पाणी गुणवत्ता राखणे, घनकचरा कचरा वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, वॉटर मिटर,बॉयोगॅस व नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन प्रत्यक्षात स्थळांना भेट देऊन पाहणी करण्यात आली.