जलयुक्त शिवार अभियानातून 166 गावात होणार 4 हजार 267 जलसंधारणाची कामे

0
13
  • 12 कोटी रुपयांची 2304 कामांची अंदाजपत्रके तयार
  • आतापर्यंत 181 कामे पूर्ण

वाशिम, दि. 30  : सन 2023-24 या वर्षात जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या माध्यमातून जिल्हयातील 166 गावात मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, कृषी, वन आणि भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलसंधारणाची 4 हजार 267 कामे प्रस्तावित असून या कामामुळे या गावांच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राच्या प्राप्त उपचार नकाशांवरुन कार्यान्वीन यंत्रणांनी कामे प्रस्तावित केली आहे. या अभियानातून जलसाठयातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे पावसाळयापूर्वी करावयाची असल्याने या कामांना प्राथमिकता देऊन ही कामे सुरु करण्यात आली आहे.

जिल्हयातील निवड केलेल्या 166 गावातील प्रस्तावित 4 हजार 267 कामांसाठी 23 कोटी 78 लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. या गावातील 2 हजार 304 कामांचे 12 कोटी 88 लक्ष रुपयांचे अंदाजपत्रके संबंधित यंत्रणांनी तयार केली आहे. 1752 कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 18 कोटी 80 लक्ष रुपयांच्या 176 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत 181 कामे विविध यंत्रणांनी पूर्ण केली आहे. त्यावर 1 कोटी 36 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

या अभियानातून विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रिय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण आवश्यकतेनुसार दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये मुलस्थानी जलसंधारणाचे उपचार राबविणे, सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविणे असे कामे देखील करण्यात येणार आहे. तसेच पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करुन पिकांसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे, अस्तीत्वात असलेल्या तसेच पाण्याच्या जुन्या संरचनांची देखभाल व दुरुस्ती करुन जलस्त्रोतांची साठवण क्षमता या अभियानातून पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यासोबतच उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून या गावातील पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान महत्वाचे ठरणार आहे.