सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
10

. महसूल सप्ताहाचा शुभारंभ

. सप्ताहभर विविध कार्यक्रम

      गोंदिया, दि.1 : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची तसेच शासनाच्या विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. त्यामुळे हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल विभागाकडून सर्वच नागरिकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे लोकाभिमुख काम करुन सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले.

        उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित ‘महसूल दिन’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री. गोतमारे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले. उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

        श्री. गोतमारे पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन कामकाजासाठी संबंध येत असतो, त्यामुळे शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. जमिनीशी संबंधित अनेक लोकं कामानिमीत्त महसूल विभागाकडे येत असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या कामाला महत्व देवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून जबाबदारीने कामे पार पाडावीत. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्याबरोबरच प्रशासनातील सर्व घटकांच्या सक्रीय सहभागावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        श्रीमती स्मिता बेलपत्रे म्हणाल्या, महसूल विभागाची फार जूनी ओळख आहे. सर्व विभागावर नियंत्रण व नियमन ठेवणे हे महसूल विभागाचे काम आहे. शासन व प्रशासनाचा चेहरा म्हणून महसूल विभाग काम करीत असतो. शासनाने सोपवलेली जबाबदारी प्रत्येकाने सक्षमपणे पार पाडावी असे त्यांनी सांगितले.

        श्रीमती पुजा गायकवाड यांनी सांगितले की, महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक समृध्द करण्याची जबाबदारी या विभागावर असते. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य देण्यात येते असे त्या म्हणाल्या.

        श्रीमती रोहिणी सागरे म्हणाल्या, जमिनीची मोजणी करणे हे भूमी अभिलेख विभागाचे काम असल्यामुळे महसूल विभागाशी फार जवळचा संबंध येत असतो. प्रत्येक घटकाशी महसूल विभाग जुळलेले असते असे त्या म्हणाल्या.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील म्हणाल्या, महसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क येत असतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांचे/तक्रारींचे निराकरण करण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. नैसर्गिक आपत्ती काळात समन्वय ठेवून सतर्क राहणे तसेच निवडणूकीची कामे सक्षमपणे पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

       यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे 16 कर्मचारी व अधिकारी यांचा सन्मानपत्र देवून सत्कार, 8 नविन कोतवालांना नियुक्ती पत्र, अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 5 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयाचा धनादेश, 11 लाभार्थ्यांना क्रिमीलेयर व उत्पन्न प्रमाणपत्र, 6 राशन कार्ड वाटप, 20 लाभार्थ्यांना कलम 155 अंतर्गत दुरुस्त केलेले 7/12 वाटप, 14 पोलीस पाटील यांना नुतनीकरण प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

       कार्यक्रमास नायब तहसिलदार आर.एम.पालांदूरकर, सीमा पाटणे यांचेसह सर्व कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, महसूल सहायक, मंडळ अधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तहसिलदार समशेर पठाण यांनी मानले.