शाश्वत विकासासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

0
9

भंडारा दि.15: विकास ही सामुहिक प्रक्रीया असून शाश्वत विकासासाठी नागरिकांनी प्रशासन करत असलेल्या  प्रयत्नांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले.

पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, खासदार सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्त्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, यांच्यासह  प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भंडारावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात श्री. कुंभेजकर यांनी जिल्हयातील  विकास कामांचा  आढावा मांडला. त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानात 95 गावात कामे सुरू असून  गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेमध्ये 14 हजार घनमीटर गाळ काढल्याचे सांगितले.

प्रशासकीय पातळीवर सध्या गतीमान पध्दतीने नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासन बांधिल असुन महसुल सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात 8 अनुकंपाधारकांना थेट तलाठी संवर्गात नियुक्तीपत्रे त्यांच्या हातात देण्यात आली. तर या संपुर्ण सप्ताहात फोकस ॲप्रोच ठेवून नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे 71 प्रस्ताव शासनामार्फत मंजूर झाले असून  त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाच्या नवीन वाळु धोरणानुसार जिल्हयातील 11 वाळु डेपो ई-लिलावात गेले आहेत. या डेपोमार्फत 62 हजार ब्रास वाळु सामान्य नागरिकांना 600 रूपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली. सद्या 7 हजार ब्रास वाळु या डेपोमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला सन्मान योजनेचा 5 लाखाहून अधिक माता-भगीनींनी जिल्ह्यात लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे कष्टकरी वर्गातील महीलांना अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येतो. महिलांच्या अर्थसाक्षरतेला बळ देण्यासाठी हे स्त्री सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणाईने मादक पदार्थाचे सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

भंडारा : पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी सहायक शिक्षीका मंजुषा नंदेश्वर,बाळासाहेब मुंडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी कर्तव्य सपाटे यालाही सन्मानित करण्यात आले. रानभाजी महोत्सव पाककला स्पर्धेतील यामध्ये प्रथम क्रमांक पुष्पा नागोसे, तर मंगला डहाके, नगीना बनसोड यांनाही सन्मानित करण्यात आले.

सैनिक कल्याण कार्यालयातर्फे शहीद वारसांना आर्थिक मदत

शहीद नायक चंद्रशेखर भोंडे हे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. त्यांना आर्थिक  मदतीचा धनादेश म्हणून त्यांच्या पत्नी व माता पित्यांना 60 लाखाचे धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ताम्रपट देऊन कुंटुबियांचा सन्मान करण्यात आला.

तर ऑपरेशान रक्षक दरम्यान कर्तव्यावर शहीद झालेले नायक सागर खंडाईत यांच्या कुटुंबियांना ही 60 लाखाचे धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ताम्रपट देऊन कुंटुबियांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त 26 जुलै रोजी कारगील विजय दिवसानिमीत्त वृक्षारोपणात प्रथम क्रमांक आलेल्या पूर्व सैनिक बहुद्देशीय संस्था, ठाणा व माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, पवनी यांना अनुक्रमे 20 हजार व 10 हजाराचे धनादेश देण्यात आले. तसेच आवास योजनेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना ही सन्मानित करण्यात आले.